Join us  

शेफाली द हंड्रेडमध्ये बर्मिंघम फ्रँचायझीकडून खेळण्यास सज्ज

भारतीय क्रिकेट बोर्डच्या (बीसीसीआय) एका सूत्राने सांगितले,‘बर्मिंघम फ्रँचायझीने शेफालीसोबत संपर्क केला होता आणि करार होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 6:06 AM

Open in App

नवी दिल्ली : भारताची युवा महिला फलंदाज शेफाली वर्मा ‘द हंड्रेड’ स्पर्धेत बर्मिंघम फिनिक्सतर्फे खेळण्याच्या तयारीत आहे आणि या वर्षाच्या शेवटी महिला बिग बॅश टी-२० लीगमध्ये सिडनी फ्रँचायझीतर्फे खेळू शकते. आयसीसी महिला टी-२० आंतरराष्ट्रीय मानांकनामध्ये जगातील अव्वल फलंदाज १७ वर्षीय शेफाली आपली कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना, जेमिमा रोड्रिगज व दीप्ती शर्मा यांच्यानंतर १०० चेंडूंच्या स्पर्धेसोबत जुळणारी पाचवी भारतीय महिला क्रिकेटपटू आहे.भारतीय क्रिकेट बोर्डच्या (बीसीसीआय) एका सूत्राने सांगितले,‘बर्मिंघम फ्रँचायझीने शेफालीसोबत संपर्क केला होता आणि करार होणार आहे. ती संघात न्यूझीलंडच्या सोफी डेवाईनचे स्थान घेईल.’ सूत्राने पुढे सांगितले की,‘शेफाली महिला बिग बॅश खेळण्यासाठी सिडनी फ्रँचायझीसोबत चर्चा करीत आहे.’‘द हंड्रेड’ स्पर्धा गेल्या वर्षी महामारीमुळे स्थगित झाली. यंदा ही स्पर्धा २१ जुलैपासून खेळल्या जाणार आहे आणि पहिला सामना ओवल इनविंसिबल्स व मॅन्चेस्टर ओरिजिनल्स यांच्यादरम्यान होईल. महिला बिग बॅश लीग यंदा वर्षाच्या शेवटी होईल.

महिला संघाच्या प्रशिक्षकाची निवड लवकरचदरम्यान, राष्ट्रीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड या आठवड्यात मदनलालच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) करेल. निवर्तमान प्रशिक्षक डब्ल्यू. व्ही. रमन आणि पाच महिला प्रशिक्षकांसह एकूण ३५ दावेदारांनी महिला प्रशिक्षकपदासाठी अर्ज केले आहेत. 

टॅग्स :क्रिकेट सट्टेबाजीभारतीय क्रिकेट संघ