Sherfane Rutherford's maiden ODI ton West Indies Win Against Bangladesh in 1st ODI घरच्या मैदानात रंगलेल्या बांगलादेश विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं विजय मिळवलाय. सेंट किट्स येथील वार्नर पार्क स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात कॅरेबियन संघातील नवा हिरो शेरफेन रुदरफोर्डचा जलवा पाहायला मिळाला. त्याने केलेल्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर यजमान वेस्ट इंडिज संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. वनडेत सलग ११ पराभवानंतर कॅरेबियन संघाने हा विजय मिळवला आहे.
बांगलादेशच्या ताफ्यातील फलंदाजांकडून तीन अर्धशतके
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेश संघानं कर्णधार मेहदी हसन मिराझ (७४), सलामी बॅटर तनजीद हसन (६०) आणि महमूदुल्लाह (५०) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित ५० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात २९४ धावा केल्या होत्या.
शेरफेन रुदरफोर्ड धमाक्यात साजरं केलं पहिल शतक
धावांचा पाठलाग करताना शेरफेन रुदरफोर्ड याने धमाकेदार बॅटिंगचा नजराणा पेश केला. त्याने ७७ चेंडूत वनडे कारकिर्दीतील आपलं पहिलं शतक साजरे केले. ८० चेंडूत ७ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकाराच्या मदतीने त्याने ११३ धावांच्या खेळीसह संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
वेस्ट इंडिज कॅप्टनचीही फटकेबाजी
बांगलादेशच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या संघाने २१.४ षटकात ९४ धावांवर आघाडीच्या तीन विकेट्स गमावल्या होत्या. कॅप्टन होपला साथ देण्यासाठी शेरफेन रुदरफोर्ड मैदानात उतरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचत सामना सेट केला. होपनं ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
वनडेतील पहिल्या ८ डावात अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरला शेरफेन रदरफोर्ड
वनडेत संधी मिळाल्यापासून रुदरफोर्ड लक्षवेधी कामगिरी करताना पाहायला मिळाले आहे. आठव्या डावात शतकी खेळी करत त्याने खास विक्रमालाही गवसणी घातली. ८ वनडे सामन्यात सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडच्या जोनाथन ट्रॉट याच्यासोबत तो संयुक्तरित्या नंबर वनवरपोहचला आहे. जनाथन ट्रॉटनं पहिल्या ८ वनडेत ५ अर्धशतके आणि १ शतकासह सहावेळा अशी कामगिरी केली होती. रुदरफोर्डनंही अगदी तोच कित्ता गिरवला आहे.
Web Title: Sherfane Rutherford's maiden ODI ton guides west-indies to 5 wicket win over Bangladesh in 1st ODI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.