मुंबई : यजमान मुंबई इंडियन्स आणि कामगिरीत सातत्य राखण्यासाठी संघर्ष करीत असलेला किंग्स इलेव्हन पंजाब संघ आयपीएलमध्ये ‘करा अथवा मरा’ लढतीत बुधवारी आमनेसामने येतील. त्यावेळी उभय संघांसाठी स्पर्धेतील आव्हान कायम राखण्याची ही अखेरची संधी असेल.सातत्याने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर अंतिम चार संघात स्थान मिळवण्याच्या मुंबई संघाच्या आशा सलग तीन विजयामुळे पल्लवित झाल्या. पण रविवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धचा पराभव त्यांच्यासाठी निराशाजनक ठरला. मुंबई संघ १२ पैकी ५ सामन्यांत विजय मिळवत सहाव्या स्थानी आहे. पंजाब संघ सोमवारी पाच सामन्यांतील चौथा पराभव स्वीकारावा लागल्यामुळे पाचव्या स्थानी आहे.मुंबईला रॉयल्सविरुद्धचा पराभव विसरून आता सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. शानदार सुरुवात करणाऱ्या पंजाब संघाने मधल्या काळात लय गमावली आणि त्याचा त्यांना फटका बसला.गेल्या लढतीत कर्णधार रोहित शर्मासह मुंबईचे मधल्या फळीतील फलंदाज सपशेल अपयशी ठरले. आतापर्यंत केवळ सूर्यकुमार यादवच कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरला आहे. वेस्ट इंडिजचा सलामीवीर फलंदाज एविन लुईसला गवसलेला सूर संघासाठी दिलासा देणारी बाब आहे. या दोघांकडून संघाला चमकदार सुरुवातीची अपेक्षा आहे. त्यानंतरही उर्वरित फलंदाजांना आपली भूमिका चोख बजवावी लागेल. रोहित आरसीबीविरुद्धच्या एका सामन्याचा अपवाद वगळता उर्वरित सामन्यात अपयशी ठरला. मुंबईला रोहितसह पांड्या बंधूंकडून (हार्दिक व कृणाल) चमकदार कामगिरीची आशा आहे. मुंबईसाठी गोलंदाजीही चिंतेचा विषय आहे. जसप्रीत बुमराह, हार्दिक व मिशेल मॅक्क्लेनघन यांच्यापुढे ख्रिस गेल व लोकेश राहुल यांना रोखण्याचे आव्हान राहील.दुसरीकडे पंजाबला खेळाच्या सर्वच विभागात सुधारणा करावी लागेल. राहुल व गेल यांना सोमवारी उमेश यादवने आखूड टप्प्याच्या चेंडूवर बाद केले. यावेळी पंजाबचा डाव ८८ धावांत संपुष्टात आला. अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजिबूर रहमान दुखापतग्रस्त झाल्यामुळे पंजाबला मोठा धक्का बसला आहे. अशा स्थितीत कर्णधार रविचंद्रन आश्विन व अक्षर पटेल या फिरकी गोलंदाजांवर अतिरिक्त जबाबदारी राहील.गेल्या लढतीत पराभवानंतर बोलताना आश्विन म्हणाला की, ‘आम्ही सकारात्मक क्रिकेट खेळणार आहोत. आमच्याकडे अनुभवी खेळाडू असून नेटरनरेटवरही लक्ष ठेवावे लागेल.’ (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- मुंबई-पंजाब लढतीची उत्सुकता शिगेला, आज वानखेडेवर रंगणार निर्णायक लढत
मुंबई-पंजाब लढतीची उत्सुकता शिगेला, आज वानखेडेवर रंगणार निर्णायक लढत
यजमान मुंबई इंडियन्स आणि कामगिरीत सातत्य राखण्यासाठी संघर्ष करीत असलेला किंग्स इलेव्हन पंजाब संघ आयपीएलमध्ये ‘करा अथवा मरा’ लढतीत बुधवारी आमनेसामने येतील.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:38 AM