सचिन कोरडेपणजी - गोव्याची आघाडीची अष्टपैलू खेळाडू शिखा पांडे हिने भारतीय महिला संघात स्थान मिळवत पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले. आता ती दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यावर निघणार आहे. हा संघ मंगळवारी आफ्रिका दौ-यासाठी रवाना होईल. या दौ-यासाठी शिखा सज्ज झाली असून एक गोलंदाज म्हणून शिखाचे योगदान संघासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास गोवा महिला संघाच्या प्रशिक्षक देविका पळशीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
देविका पळशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याने एकदिवसीय क्रिकेट चॅम्पियनशीप जिंकली. आता टी-२० सुपर लीग फेरीतही गोव्याने आपली दावेदारी स्पष्ट केली आहे. जेव्हापासून पळशीकर यांनी गोव्याच्या प्रशिक्षकपदाची भूमिका सांभाळली तेव्हापासून गोव्याच्या कामगिरीचा आलेख उंचावत आहे. शिखाची फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हींचा पळशीकर यांनी बारकाईने अभ्यास केला. तिला बºयाच टिप्सही दिला. उल्लेखनीय म्हणजे, टी-२० क्रिकेटमध्ये नुकत्याच झालेल्या दोन सामन्यांत शिखाने नाबाद ९२ आणि नाबाद ५५ धावा, अशी कामगिरी केली होती. गोलंदाजीबरोबरच तिच्या फलंदाजीतही सुधारणा झाली. गोव्यासाठी तिने उत्कृष्ट नेतृत्व केले. या दोन्ही सामन्यांतील शानदार प्रदर्शनामुळे तिचा आत्मविश्वास उंचावला असेल. ती ज्या पद्धतीने खेळत आहे. त्यावरून भारतीय संघासाठी तिचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असे वाटते.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत रवाना होण्यापूर्वी भारतीय महिला संघासाठी मुंबईत पाच दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. आफ्रिका दौ-यात महिला संघ ३ एकदिवसीय सामने आणि ५ टी-२० सामने खेळणार आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर भारतीय महिलांचा हा पहिला विदेश दौरा आहे. मिताली राज हिच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळेल. १६ सदस्यीय संघात गोव्यातर्फे शिखा पांडे ही एकमेव खेळाडू आहे.
गोव्यापुढे मात्र आव्हान!
जबरदस्त प्रदर्शन करीत शिखा पांडेच्या नेतृत्वाखाली गोव्याने टी-२० च्या सुपर लीगमध्ये प्रवेश केला. आता मुंबईत मंगळवारी गोव्याचा पहिला सामना महाराष्ट्रविरुद्ध होईल. शिखा पांडेच्या अनुपस्थितीत सुनंदा येत्रेकर हिच्याकडे गोव्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिखा ही उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. तिची अनुपस्थिती संघाला नक्की भासेल. तिच्या जागी तेजस्विनी दुर्गड हिला संधी मिळाली आहे. मात्र, शिखाच्या अनुपस्थित खेळणे आमच्यासाठी एक आव्हान असेल, असे पळशीकर म्हणाल्या.