IND vs AUS, Shikha Pandey: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाला नशिबानं पुन्हा एकदा दगा दिला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध शनिवारी खेळविण्यात आलेल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघानं जबरदस्त गोलंदाजी करुनही संघाला सामना गमावावा लागला. ऑस्ट्रेलियानं अखेरच्या षटकात सामना जिंकला. भारतीय संघानं जरी सामना गमावला असला तरी एका चेंडूनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. भारतीय वेगवान गोलंदाज शिखा पांडेनं टाकलेल्या इन स्विंग चेंडूची संपूर्ण क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा केली जात आहे.
शिखा पांडे हिनं ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिली हिला अप्रतिम इन स्विंग चेंडू टाकून क्लीन बोल्ड केलं. शिखा पांडने टाकलेला चेंडू इतका अफलातून होता की फलंदाज एलिसा देखील पाहातच राहिली. तिलाही नेमकं काय घडलं ते काही क्षण कळलंच नाही. समालोचकांनीही शिखा पांडेच्या चेंडूचं 'बॉल ऑफ द सेंच्युरी'ची पदवी देत कौतुक केलं. शिखा पांडेनं टाकलेला चेंडू ऑफ साइडवरुन थेट इन स्विंग होत स्टॅम्पसच्या दिशेनं गेला. एलिसा हिली चेंडूला रोखूच शकली नाही आणि क्लीन बोल्ड झाली. भारतीय संघाचे माजी खेळाडू वसिम जाफर यांनीही शिखा पांडेच्या चेंडूला महिला क्रिकेटमधील 'बॉल ऑफ द सेंच्युरी' असल्याचं म्हटलं आहे.
आयसीसीनंही शिखा पांडेनं टाकलेल्या चेंडूवर क्लिन बोल्ड झालेल्या एलिसा हिल हिचा फोटो ट्विट करत शिखाचं कौतुक केलं आहे.