अहमदाबाद : दुखापतीतून सावरल्यानंतर अष्टपैलू हार्दिक पांड्या, सलामीवीर फलंदाज शिखर धवन व वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांचे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.
निवड समितीचे अध्यक्ष सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखाली प्रथमच आयोजित बैठकीत रविवारी संघाची निवड करण्यात आली. उपकर्णधार रोहित शर्मा अद्याप स्नायूच्या दुखापतीतून सावरलेला नाही. २९ मार्चपासून प्रारंभ होत असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये तो पुनरागमन करेल, अशी आशा आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेत संघात समावेश असलेला वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर व अष्टपैलू शिवम दुबे यांना वगळण्यात आले आहे, तर अनुभवी केदार जाधवच्या स्थानी शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. पाठीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर पुनरागमन करताना पांड्याने डीवाय पाटील टी-२० स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. संघ व्यवस्थापनाला त्याच्या पुनरागमनाची आतुरता होती. धवनच्या खांद्याच्या जानेवारीमध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान दुखापत झाली होती, तर भुवनेश्वरवर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती.
संघात धवनचे पुनरागमन झाल्यामुळे मयंक अग्रवालला बाहेर जावे लागले. तो न्यूझीलंड दौऱ्यात मिळालेल्या संधींचा लाभ घेण्यात अपयशी ठरला. या दौºयात पृथ्वी शॉची सकारात्मक फलंदाजी बघता निवड समितीने त्याला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
भारतीय संघ असा
शिखर धवन, पृथ्वी शॉ, विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव आणि शुभमन गिल.
Web Title: Shikhar Dhawan, Bhubaneswar, Pandya return; Indian Team announced
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.