मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील वन डे मालिकेला रविवारपासून सुरुवात होणार आहे. पाच वन डे सामन्यांतील पहिला सामना गुवाहाटी येथे खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत कर्णधार विराट कोहलीची फटकेबाजी अनुभवण्याची संधी मिळणार आहे. या मालिकेत कोहलीला महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या 10000 धावांच्या क्लबमध्ये एन्ट्री करण्याची संधी आहे. पण, याच मालिकेत सलामीवीर शिखर धवनलाही विक्रमाची संधी आहे.
2010 साली वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या धवनने 109 डावांमध्ये 4823 धावा केल्या आहेत. वन डेत 5000 धावांचा पल्ला गाठण्यासाठी 177 धावांची आवश्यकता आहे. विंडीजविरुद्धच्या चार सामन्यांत धवनने हा पल्ला गाठल्यास तो कोहलीचा विक्रम मोडू शकतो. सर्वात जलद 5000 धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांचा विक्रम धवनला आपल्या नावावर करता येणार आहे. सध्या हा विक्रम कोहलीच्या ( 114 डाव) नावावर आहे.
सर्वात जलद 5000 धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला ( 101 डाव) अग्रस्थानी आहे. कोहलीसह धवनला वेस्ट इंडिजचे महान फलंदाज सर व्हिव्हियन रिचर्ड ( 114 डाव) यांनाही पिछाडीवर टाकण्याची संधी आहे. नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत धवनने वन डे प्रकारात दमदार पुनरागमन केले. त्याने पाच डावांमध्ये 342 धावा केल्या.