Shikhar Dhawan Big Records, IPL 2022 PBKS vs CSK Live Updates: पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरूद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईने संघात एकही बदल केला नाही. पंजाबने मात्र संघात तीन महत्त्वाचे बदल केले. शाहरूख खानसह नॅथन एलिस आणि वैभव अरोरा यांना संघाबाहेर करण्यात आले. तर संदीप शर्मा, भानुका राजपक्षे आणि रिषी धवन या तिघांना संघात स्थान देण्यात आले. या सामन्यात पहिल्याच डावात गब्बर खेळाडू शिखर धवनने मोठा पराक्रम केला.
भारतीय संघाचा धडाकेबाज डावखुरा सलामीवीर शिखर धवन याने चेन्नई विरूद्धच्या सामन्यात डबल धमाका केला. चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यासाठी तो मैदानात उतरला. मैदानावर पाय ठेवताच धवनने आपले २०० IPL सामने पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा शिखर धवन आठवा खेळाडू ठरला. या यादीत महेंद्रसिंग धोनी २२८ सामन्यांसह अव्वलस्थानी आहे. आणि विशेष बाब म्हणजे, आतापर्यंत २०० सामने खेळणाऱ्यांमध्ये सर्व भारतीय खेळाडू आहेत.
आणखी एक कारनामा म्हणजे, शिखर धवनने चेन्नई विरूद्धच्या सामन्यात ६,००० धावांचा टप्पा ओलांडला. IPLच्या इतिहासात असा पराक्रम करणारा तो केवळ दुसरा फलंदाज ठरला. IPL मध्ये विराट कोहलीच्या नावे सर्वाधिक (६ हजार ४०२) धावा आहेत. तर रोहित शर्मा हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितच्या नावे ५ हजार ७६४ धावा आहेत. दिल्लीकडून खेळणारा डेव्हिड वॉर्नर यादीत ५ हजार ६६८ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे.