मुंबई : आशिया चषक स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीच्या संघात स्थान मिळवण्यासाठी कर्णधार विराट कोहली यालाही यो-यो टेस्ट द्यावी लागणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करणार आहे. या मालिकेत धक्कादायक बदल पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इंग्लंड दौऱ्यातील अपयशानंतर सलामीवीर शिखर धवनला या कसोटी संघातून डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच्या जागी मुंबईचा पृथ्वी शॉला संधी मिळणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.
या मालिकेसाठीचा संघ 25 सप्टेंबरला निवडण्यात येणार होता. मात्र इशांत शर्मा आणि आर अश्विन यांच्या फिटनेस टेस्ट अहवालासाठी ही निवड पुढे ढकलण्यात आली आहे. हे दोघेही शनिवारी यो-यो टेस्ट देणार आहेत. अश्विनला इंग्लंड दौऱ्यातील तिसऱ्या कसोटीत दुखापत झाली होती. इशांतलाही दुसऱ्या कसोटीत दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावे लागले होते. त्यामुळे त्यांना यो-यो टेस्ट द्यावी लागणार आहे. आशिया चषक स्पर्धेत धवन खोऱ्याने धावा करत असला तरी त्याला कसोटी संघातून वगळण्यात येणार असल्याचा दावा वृत्तपत्राने केला आहे.