BCCIने आशियाई स्पर्धेसाठी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली संघ जाहीर केला. जो शिखर धवनच्या नेतृत्वाखाली असणे सर्वांना अपेक्षित होता. निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरने युवा खेळाडूंना या स्पर्धेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. धवन २०२२ पासून वन डे क्रिकेटपासून दूर आहे आणि तो आगामी आशिया चषक व वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची शक्यताही कमीच आहे. तरीही बीसीसीआय त्याला वार्षिक १ कोटी पगार देत आहे. बीसीसीआच्या वार्षिक करारात धवनचा सी गटात समावेश केला आहे. पण, सद्यस्थिती पाहता त्याला संधीच मिळत नाही आणि तरीही बीसीसीआय त्याला का पगार देतेय?
इशान किशन आणि शुबमन गिल यांनी वन डे क्रिकेटमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करताना द्विशतकं झळकावली. त्यानंतर शिखर धवन वन डे संघातून बाहेर गेलेला दिसलाय.. गिलने संघातील सलामीचे स्थान पक्के केल्याने धवनला आशिया चषक किंवा वर्ल्ड कपमध्ये संधी मिळण्याची शक्यता फार कमीच आहे. शिवाय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्येही भारताकडे प्रतिभावान युवा खेळाडू आहेत. त्यामुळेच आगरकरने आशियाई स्पर्धेसाठी युवा खेळाडूंचीच निवड करणे योग्य समजले.
“शिखरसाठी दार नक्की बंद नाही. तीन फॉरमॅट आणि एक पॅक केलेले कॅलेंडर आहे. जेव्हा मोठ्या स्पर्धा असतील तेव्हा आमच्याकडे नेहमी बॅकअप तयार असले पाहिजे. तूर्तास, अजितने निर्णय घेतलेला आहे. जर त्याला तरुण खेळाडूंना आजमावायचे असेल तर तो त्याचा आणि निवडकर्त्यांचा निर्णय आहे,” असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले.
२०१९च्या वर्ल्ड कप नंतर शिखर धवनची कामगिरीसामने - ३७धावा - १३१३सर्वोत्तम - ९८ सरासरी - ४१.०३१००/५० - ०/१२
या चार वर्षांत शुबमन गिलने २४ वन डे सामन्यांत ६५.५५च्या सरासरीने १३११ धावा केल्या आहेत. त्यात चार शतकं व ५ अर्शशतकांसह एका द्विशतकाचा समावेश आहे. “सध्या शिखरसाठी हे निश्चितच अवघड आहे. परंतु लोकांनी हे देखील समजून घेतले पाहिजे की हा खेळ आहे आणि दुखापत होऊ शकते. त्यावेळी तो सर्वात जवळचा पर्याय आहे. एकदा विश्वचषक संपला की अजित त्याच्याशी संक्रमण योजनेवर बोलेल. सध्या तो अन्य खेळाडू इतकाच महत्त्वाचा आहे,'' असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.