नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून केरळमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढत असल्याचे समोर येत आहे. यावर्षी १ लाखांहून अधिक लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. अशा स्थितीत तेथील स्थानिक लोक कुत्र्यांना जीवे मारत आहेत. कुत्र्यांची होत असलेली हत्या पाहून भारतीय संघाचा क्रिकेटपटू शिखर धवनने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हे सर्व थांबवावे असे आवाहन देखील धवनने केले आहे.
दरम्यान, अलीकडेच केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातून एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये लोकांनी एका कुत्र्याला क्रूरपणे मारले होते. कुत्र्यांच्या या वाढत्या हत्या पाहून शिखर धवनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केरळच्या जनतेला आवाहन केले आहे. "केरळमध्ये कुत्र्यांची सामूहिक हत्या केली जात आहे. हे खूप भयावह आहे. मी अशा निर्णयांवर विचार करण्याचे आणि हत्या थांबवण्याची विनंती करत आहे," अशा शब्दांत धवनने कुत्र्यांची हत्या करणे चुकीचे असल्याचे म्हटले.
सामूहिक लसीकरण मोहीम राबविण्याचे आदेश
केरळ राज्यातील कोझिकोड या शहराच्या महापौर बीना फिलिप यांनी माध्यमांना सांगितले की, "मी कुत्र्यांची हत्या करण्याच्या बाजूने नाही, परंतु जर कुत्र्यांनी तुमच्या मुलांवर हल्ला केला आणि लोकांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली तर त्यांना दोष देता येणार नाही. सध्याच्या परिस्थितीत लोकांना दोष देणे चुकीचे ठरेल." या घटनेवर केरळ सरकारने २० सप्टेंबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत सर्व भटक्या कुत्र्यांसाठी सामूहिक लसीकरण मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.