कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. मोदींच्या या घोषणेचं सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी अनेक क्रीडापटू पुढे आले आहेत. त्यात गुरुवारी टीम इंडियाचा गब्बर अर्थात शिखर धवन याची भर पडली. भारतीय संघाचा सलामीवीर धवनने पंतप्रधान मदत निधी रक्कम जमा केली आहे आणि त्यानं इतरांनाही आवाहन केले आहे.
तो म्हणाला," सर्वांनी घरातच राहा आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या. मी राष्ट्रीय मदत निधीत छोटंसं योगदान दिले आहे. तुम्हीही पुढाकार घेऊन मदतीचा हात पुढे करा."
पाहा व्हिडीओ...
दरम्यान, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिनेही मदतीचा हात पुढे केला आहे. सिंधूनं कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तिनं आंध्र प्रदेश व तेलंगणा मुख्यमंत्री मदतनिधीत ही रक्कम जमा केली आहे.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं पश्चिम बंगाल सरकारला 50 लाख किमतीचे तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून ते अन्न गरजूपर्यंत पोहोचेल. भारताचा माजी सलामीवर गंभीरनंही त्याच्या खासदारकी निधीतून दिल्ली सरकारला 50 लाख रुपये दिले.
टेनिस स्टार सानिया मिर्झानेही रोजंदारी कामगारांना अन्न आणि मुलभूत वस्तू देण्याचा निर्धार केला. कुस्तीपटू बजरंग पुनियानेही त्याचा सहा महिन्याचा पगार हरयाणा सरकारला दिला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशननेही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 50 लाख देण्याचा निर्णय घेतला आहे.