पोर्ट ऑफ स्पेन: शिखर धवनच्या नेतृत्वात वेस्टइंडिजविरुद्ध भारतीय संघ शुक्रवारपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात राखीव बाकावरील दुसऱ्या फळीतील खेळाडूंकडे स्वत:ला सिद्ध करण्याची नामी संधी असेल.
द्विपक्षीय वन-डे मालिकांचे आयोजन होऊ नये अशी चर्चा सुरू असताना ही मालिका खेळली जात आहे. बेन स्टोक्सच्या अचानक निवृत्तीनंतर आयसीसीच्या व्यस्त वेळापत्रकाचा मुद्दा ऐरणीवर आला. तीनही प्रकारात खेळणे शक्य नसल्याची खदखद स्टोक्सने व्यक्त केली. अशावेळी कसोटी आणि टी-२० प्रकारात अडकलेल्या एकदिवसीय क्रिकेटला स्वत:चे अस्तित्व टिकविणे कठीण होत आहे.
वेस्टइंडिज संघ फेब्रुवारीत तीन वन-डे आणि तीन टी-२० सामने खेळण्यासाठी भारतात येऊन गेला. आता उभय संघांत पुन्हा मालिका होत आहे. यंदा टी-२० विश्वचषकाचे आयोजन होणार असल्याने वन-डेचे महत्त्व थोडेफार कमी झाले. येथे मात्र दिग्गजांच्या अनुपस्थितीत राखीव बाकावरील खेळाडू खेळणार असल्याने ‘दम’ सिद्ध करण्याची त्यांच्याकडे संधी असेल.
शुभमन गिलचे पुनरागमन झाले. धवनसोबत तो खेळल्यास डावे- उजवे संयोजन असेल. याशिवाय इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यापैकी एकालादेखील संधी मिळू शकेल. मधली फळी निवडण्यासाठी व्यवस्थापनाला डोके खाजवावे लागेल.
दीपक हुड्डा तिसऱ्या, तर सूर्यकुमार चौथ्या स्थानावर खेळू शकतो. श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. इंग्लंडमध्ये आखूड टप्प्याचे चेंडू खेळताना अय्यरच्या उणिवा चव्हाट्यावर आल्या होत्या. हार्दिकच्या अनुपस्थितीत शार्दुल ठाकूर हा गोलंदाजी ऑलराऊंडर म्हणून पर्याय असेल. फिरकीला मदत मिळणार असल्याने युझवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा संघात असतील. तिसरा गोलंदाज म्हणून अक्षर पटेल आहेच. वेगवान अर्शदीपसिंग यालादेखील संधी दिली जाईल. प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज हे मुख्य गोलंदाज असतील. विंडीजची कामगिरी अलीकडे चांगली झालेली नाही.
लाराने दिल्या टिप्स
क्विन्स पार्क ओव्हलवर ब्रायन लाराने वेस्टइंडिजच्या सराव शिबिरास बुधवारी भेट दिली. त्याने मुख्य कोच फिल सिमन्स यांच्यासह खेळाडूंशी संवाद साधला. मागच्या १२ महिन्यात १७ पैकी १२ सामने गमविणाऱ्या विंडीज संघासाठी लाराचे मार्गदर्शन ‘बूस्टर’ मानले जात आहे.
- वन-डे प्रकारात धवन दुसऱ्यांदा देशाचे नेतृत्व करेल. नियमित कर्णधार रोहित शर्मा याला विश्रांती देण्यात आली. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांनीही विश्रांती घेतली.
- एखादा खेळाडू नियमितपणे खेळत नसेल तर त्याला स्थान टिकविणे किती कठीण होते, हे इंग्लंड दौऱ्यात कळले. कामगिरीत सातत्य राखणारा धवन मात्र मर्यादित सामन्यात संधी मिळत असल्याने मागे राहिला.
- पहिल्या सामन्यात धवनसोबत दुसरा सलामीवीर कोण? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
प्रतिस्पर्धी संघ असे
भारत : शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड़, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकुर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.
वेस्टइंडिज : निकोलस पुरन (कर्णधार), शाय होप (उपकर्णधार), शमर ब्रूक्स, कीसी कार्टी, जेसन होल्डर, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रैंडन किंग, काइल मेयर्स, गुडकेश मोती, कीमो पॉल, रोवमॅन पॉवेल और जेडन सील्स.