Shikhar Dhawan Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा दमदार सलामीवीर शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिखर धवनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला आणि आपल्या निर्णयाबद्दल सांगितले. शिखर धवन संघात 'गब्बर' या टोपणनावाने प्रसिद्ध आहे. IPL 2024 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना दिसला होता, परंतु दुखापतीमुळे तो अनेक सामने खेळू शकला नाही. तशातच आता या निवृत्तीच्या निर्णयानंतर तो IPL 2025 मध्ये खेळणार की नाही, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. कारण त्याच्या IPL निवृत्तीबाबत त्याने व्हिडिओमध्ये काहीही स्पष्ट केलेले नाही. व्हिडिओ पोस्ट करताना शिखरने लिहिले, "मी माझ्या क्रिकेट प्रवासाचा अध्याय थांबवत आहे. मी माझ्यासोबत असंख्य आठवणी आणि चांगले क्षण घेऊन जात आहे. मला दिलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद! जय हिंद!"
व्हिडीओमध्ये काय म्हणाला शिखर धवन?
"सर्वांना नमस्कार, आज मी अशा एका वळणावर उभा आहे जिथून मागे वळून पाहिले तर चांगल्या आठवणी आहेत, पुढे संपूर्ण आयुष्य आहे. भारतासाठी क्रिकेट खेळणे हे माझ्या जीवनाचे ध्येय होते. ते मी पूर्ण केले. माझे कुटुंब, माझे बालपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हा, ज्यांच्या हाताखाली क्रिकेट शिकलो ते मदन शर्मा सर... या सर्वांचा मी आभारी आहे. संघात खेळताना मला चाहत्यांचे प्रेम मिळाले. पण आयुष्यात पुढे जायचे असेल तर पुस्तकाची पाने उलटणे आवश्यक असते. तेच मी करत आहे. मी माझ्या देशासाठी मनसोक्त क्रिकेट खेळलो याचे मला समाधान आहे. मला क्रिकेट खेळायची संधी दिल्याबद्दल BCCI आणि दिल्ली क्रिकेट संघटनेटेही आभार. निवृत्ती घेताना मी स्वतःला हेच सांगतो की यापुढे देशासाठी खेळता येणार नाही याचे दु:ख करत बसण्यापेक्षा आतापर्यंत जे खेळलो त्याचे मला मनापासून समाधान आहे," अशा शब्दांत शिखर धवनने आपल्या भावना व्यक्त केल्या.