Shikhar Dhawan, T20 World Cup 2022: भारतीय संघात सध्या नव्या दमाच्या आणि अनुभवी अशा दोन्ही प्रकारच्या खेळाडूंचा भरणा आहे. भारताचा एक संघ जेव्हा खेळत असतो तेव्हा बरेच प्रतिभावान खेळाडू संघाबाहेर बसलेले असतात. अशा वेळी सध्या चर्चेत नसलेल्या अनेक खेळाडूंना पुन्हा संघात स्थान मिळणं कठीणच आहे. पण भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियात जागा मिळण्याबाबत आशावादी आहे. एका मुलाखतीत त्याला या संबंधी जेव्हा विचारण्यात आले त्यावेळी त्याने वर्ल्डकपपर्यंत संघात पुनरागमन करण्याचा त्याचा प्लॅन सांगितला.
"टी२० विश्वचषक येत आहे. मला माहीत आहे की जर मी IPL मध्ये चांगली कामगिरी केली तर मी संघात प्रवेश करू शकतो. मी सध्या खूप परिश्रम घेत आहे. मी स्वत:साठी एक टार्गेट सेट केलं आहे. त्यानुसार मी कामगिरी करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे IPL मध्ये दमदार कामगिरी करून टीम इंडियात पुनरागमन करणं हाच माझा सध्याचा प्लॅन आहे", असं धवनने टीओआयशी बोलताना सांगितलं.
सध्या भारतीय संघात कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल आणि इशान किशन हे तीन सलामीवीर आहेत. ऋतुराज गायकवाड सारखा नवा खेळाडू अद्यापही संधीच्या शोधात आहे. अशा परिस्थितीत शिखर धवनला पुन्हा संघात स्थान मिळवायचं असेल तर IPL मधील दमदार कामगिरीसोबतच चमत्काराचीही गरज आहे.