Shikhar Dhawan Rishi Dhawan, IPL 2022 PBKS vs CSK: चेन्नई आणि पंजाब यांच्या किंग साईज सामन्यात पंजाबने विजय मिळवला. शिखर धवनच्या नाबाद ८८ धावांमुळे पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जला १८८ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात अंबाती रायुडूने दमदार ७८ धावांची खेळी केली. पण अखेरच्या षटकात दडपण असताना रिषी धवनने धोनीची विकेट काढत मोक्याच्या क्षणी पंजाबला विजय मिळवून दिला. या विजयानंतर संघमालकीण प्रिती झिंटानेही (Preity Zinta) खेळाडूंचे कौतुक केले.
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मयंक अग्रवाल आणि शिखर धवन जोडीने चांगली सुरूवात केली होती. मयंक १८ धावांवर बाद झाला. पण शिखऱ आणि राजपक्षे यांनी शतकी भागीदारी केली. ११० धावांच्या भागीदारीनंतर राजपक्षे ४२ धावांवर बाद झाला. लियम लिव्हिंगस्टोनने देखील ७ चेंडूत १९ धावा काढत उपयुक्त खेळी केली. पण शिखर धवनने मात्र शेवटपर्यंत खिंड लढवली. त्याने ५५ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ८८ धावा कुटल्या. CSKकडून ब्राव्होने सर्वाधिक २ बळी घेतले.
या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर रॉबिन उथप्पा १ धाव काढून बाद झाला. पाठोपाठ मिचेल सँटनर (९), शिवम दुबे (८) झटपट बाद झाले. ऋतुराज गायकवाडने धावांचा वेग वाढवला होता, पण २७ चेंडूत ४ चौकार मारत तो ३० धावांवर बाद झाला. त्यानंतर अंबाती रायुडूने तुफान फटकेबाजी केली. त्याने ७ चौकार आणि ६ षटकार खेचत ३९ चेंडूत ७८ धावा केल्या. पण रबाडाने त्याला मोक्याच्या क्षणी बाद करत सामन्यात रंगत आणली.