दुबई : ‘दुखापातीतून सावरलेल्या श्रेयस अय्यरच्या समावेशाने संघ आता मजबूत झाला आहे. त्यामुळे आता आगामी आयपीएल स्पर्धेत संघ शानदार सुरुवातीसह वाटचाल करण्याचा प्रयत्न करेल,’ असे मत दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फलंदाज शिखर धवन याने व्यक्त केले आहे.
यंदाच्या आयपीएलचे दुसरे सत्र १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये रंगेल. धवनने दिल्ली फ्रेंचाईजीच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले की, ‘आम्ही लीगच्या पहिल्या सत्रात चांगल्या लयीमध्ये होतो; पण ही लीग नंतर स्थगित करण्यात आल्याने लय तुटली. त्यामुळे आता पुन्हा ती लय मिळवण्यासाठी आम्हाला मेहनत घ्यावी लागेल. संघाचे संतुलन चांगले आहे आणि आता श्रेयस अय्यरच्या समावेशाने संघ आणखी मजबूत बनला आहे.’ मार्च महिन्यात मायदेशात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेदरम्यान श्रेयसला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला आयपीएलमधूनही माघार घ्यावी लागली.
सध्या संघाचे सर्व लक्ष सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पहिल्या सामन्याकडे लागले असल्याचेही धवनने म्हटले.
- यंदाच्या सत्रात आतापर्यंत धवनने सर्वाधिक धावा काढत ऑरेंज कॅपवर कब्जा केला आहे. धवन म्हणाला की, ‘लय मिळविणे खूप चांगले आहे. संघातील वातावरणही शानदार आहे. सर्व खेळाडू मेहनत घेत असून, आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी मी खूप उत्सुक आहे. चांगली सुरुवात होणे आमच्यासाठी खूप गरजेचे आहे. पहिल्या सामन्यापासूनच चांगली कामगिरी करण्याचे आम्ही ठरविले असून, यासाठी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत आहोत.’ २२ सप्टेंबरला दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात सामना होईल.
Web Title: shikhar dhawan says team strong with shreyas Iyer comeback pdc
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.