नवी दिल्ली-
भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन याला क्रिकेटच्या एकाच प्रकारात संघात स्थान दिलं जात असल्याच्या मुद्दयावर कोणताच कमीपणा वाटत नाही. तसंच आपल्याला मिळत असलेल्या संधीत आपली कामगिरी उत्तम कशी राहील याचाच प्रयत्न करत असल्याचं शिखर धवननं म्हटलं आहे. संघातील सिनिअर खेळाडूंच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी शिखर धवनकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. जोवर संघासाठी मी उपयोगी आहे तोवर खेळत राहीन असं धवन यानं मनमोकळेपणानं म्हटलं आहे.
"जोवर मी भारतीय संघासाठी उपयोगी ठरत आहे. तोवर मी संघासाठी खेळत राहीन. मला संघावर कोणत्याही प्रकारचं ओझं व्हायचं नाही", असं शिखर धवन म्हणाला. वेस्ट इंडिज दौऱ्यात एकदिवसीय मालिकेत संघाचं यशस्वीरित्या नेतृत्व केल्यानंतर धवननं पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत दिलखुसालपणे प्रश्नांना उत्तरं दिली.
शिखर धवननं २०२२ वर्षाच्या सुरुवातीपासून ते आताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत भारतासाठी २२ एकदिवसीय सामन्यांमध्ये १० अर्थशतकांच्या साथीनं ९७५ धावा केल्या आहेत. धवनचा हा आकडा भारताच्या इतर खेळाडूंपेक्षा सर्वाधिक आहे. याबाबत जेव्हा धवनला विचारण्यात आलं तेव्हा त्यानं सविस्तर उत्तर दिलं.
"मी शांत आणि एक परिपक्व व्यक्ती आहे. माझ्या कामगिरीचे आकडे माझा अनुभव दाखवून देतात. खेळाप्रती माझी समज खूप मजबूत आहे आणि फलंदाजीच्या तंत्रात सुधारणा करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. क्रिकेटच्या एका प्रकारावर लक्ष केंद्रीत करणं आणि ती समजून घेणं देखील महत्वाचं आहे. मला एकदिवसीय क्रिकेट प्रकारातील गरजा चांगल्या समजतात आणि त्यानं मला खूप मदत होते", असं धवन म्हणाला.
मी कधीच निराश झालो नाही- धवनसध्या ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रकाराची लोकप्रियता खूप वाढली आहे आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांचं आयोजन देखील कमी होऊ लागलं आहे. अशा परिस्थितीत फक्त एका फॉरमॅटमध्ये खेळणं कितपत योग्य आहे असं धवनला विचारलं असता त्यानं मी गोष्टीनं कधीच निराश झालो नाही असं म्हटलं. "मला या गोष्टीची कधीच निराशा वाटली नाही. मी कोणत्या फॉरमॅटमध्ये खेळतोय याबाबत विचार करण्यास मी जास्त महत्व देत नाही. मला दोन-तीन महिन्यांनी खेळण्याची संधी मिळते आणि त्यामुळे फ्रेश माइंडनं खेळण्यासाठी मदत होते असा मी विचार करतो", असं धवन म्हणाला.
"मला जे मिळतं त्यात मी खूश असतो. भारतासाठी जर मला केवळ एकाच फॉरमॅटमध्ये खेळण्याची संधी मिळत असेल तर माझा प्रयत्न असा असतो की मी माझं सारंकाही याच फॉरमॅटमध्ये देईन. मी सकारात्मक विचार करणारा व्यक्ती आहे. तुम्हाला माझ्यात केव्हाच नकारात्मकता दिसून येणार नाही", असंही तो म्हणाला.
"मी ३६ वर्षांचा आहे आणि पहिल्यापेक्षा अधिक फीट आहे. माझ्या कौशल्यातही सुधारणा झाली आहे. मी जीम, योगा, धावणं यासोबत व्यायामावर जोर देऊन स्वत:ला उत्तम करण्याचा प्रयत्न केला आहे", असं शिखर धवननं म्हटलं.