मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा सलामीवीर शिखर धवन हा फक्त एका ट्विटमुळे ट्रोल होताना दिसत आहे. हे ट्विट त्याने रविवारी झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यापूर्वी केले होते. पण आता दुसऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला चाहत्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरल्याचे दिसत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यापूर्वी धवनने, मी सामन्यासाठी सज्ज आहे. असे म्हटले होते. पण या सामन्यात धवनला संधीच देण्यात आली नव्हती. धवनच्याऐवजी लोकेश राहुलला संघात स्थान देण्यात आले होते. राहुल यावेळी रोहित शर्माच्या साथीने सलामीला आला होता. भारताला पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. पण राहुलने या सामन्यात अर्धशतकी खेळी साकारली होती.
भारताचे 127 धावांचे माफक लक्ष्य असूनही अखेरपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात 3 विकेट राखून विजय मिळवताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ग्लेन मॅक्सवेल ( 56) आणि डी अॅर्सी शॉर्ट ( 37) यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. जस्प्रीत बुमराहने 19व्या षटकात पुन्हा एकदा उपयुक्त गोलंदाजी करताना जगातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे सिद्ध केले. पण, अखेरच्या षटकार उमेश यादवला विजय मिळवण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला.रोहित शर्मा ( 5) माघारी परतल्यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी भारताच्या डावाला आकार दिला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना संघात झोकात पुनरागमन केले. न्यूझीलंड दौऱ्यानंतर विश्रांतीवर गेलेला कोहलीनं या सामन्यात विक्रमासह कमबॅक केले. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 500 धावांचा पल्ला ओलांडला आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.
कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील वक्तव्यामुळे निलंबनाची कारवाई झालेल्या राहुलनेही भारतीय संघाकडून आज पुनरागमन केले. कोहलीला मोठी खेळी करता आली नाही आणि तो 24 धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेल्या रिषभ पंतला ( 3) समन्वयाच्या अभावामुळे धावबाद होऊन माघारी परतावे लागले. महेंद्रसिंग धोनीनं संयमी खेळ केला, परंतु राहुल मोठे फटके मारण्याच्या नादात बाद झाला. राहुलने 36 चेंडूंत 50 धावा केल्या. दिनेश कार्तिक व कृणाल पांड्या काही चमक न दाखवता माघारी परतले. धोनी एका बाजूने टिकून खेळत होता, परंतु त्यालाही मोठे फटके मारता येत नव्हते. भारताला 20 षटकांत 126 धावांपर्यंतच मजल मारता आली.