नवी दिल्ली : पुवलामा येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी बीसीसीआय, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर नंतर आता भारताचा सलामीवीर शिखर धवनही सरसावला आहे. शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी मी तयार असल्याचे धवनने इन्टाग्रामवरील एका व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
धवन म्हणाला की, " पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले आहेत. देशवासिय याबाबत शोक व्यक्त करत आहेत. पण मी विचार केला आहे की, शहीद जवानांच्या कुटुंबियांची मदत करायला हवी. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत करण्याच्या विचारात मी आहे. शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करायला सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहनही मी करत आहे."
हा पाहा धवनचा व्हिडीओ
आता चर्चा नको, युद्धचं हवं - गौतम गंभीर
पुलवामा हल्ल्यानंतर आता पाकिस्तानशी चर्चा होऊ शकत नाही, आता युद्ध करायलाच हवे, अशी भुमिका भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने घेतले आहे. गंभीरने एक ट्विट केले असून त्यामध्ये आपले मत व्यक्त केले आहे. गंभीरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " यापूर्वी पाकिस्तानशी चर्चा होत होती. पण चर्चा करण्याची ही वेळ नक्कीच नाही. आता चर्चा करण्यापेक्षा काही तरी करण्याची वेळ आली आहे. आता चर्चा टेबलवर नाही तर आता भेट थेट युद्धाच्या रणांगणात व्हायला हवी."
यापुढे शंभर शहीद जवानांच्या मुलांना मदत करणार - गौतम गंभीर
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला आर्मीमध्ये जाता आले नाही, याचा आता पश्चाताप होत आहे. पण आर्मीमध्ये जाता आले नसले तरी शहीद जवानांच्या मुलांसाठी गंभीर आपल्या एनजीओच्या माध्यमातून कार्य करत आहे. गंभीरने जवानांच्या 50 मुलांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून मदत केली होती. आता यापुढे शंभर जवानांच्या मुलांना मदत करत असल्याचे गंभीरने सांगितले.
आर्मीमध्ये जाण्याबद्दल गंभीर म्हणाला की, " क्रिकेट हे माझे पहिले प्रेम कधीच नव्हते. मला आर्मीमध्ये जायचे होते. पण बारावीमध्ये असताना मी दिल्लीकडून रणजी क्रिकेट स्पर्धा खेळलो. माझी कामगिरी चांगली होत गेली. त्यामुळे मी क्रिकेटवर अधिक लक्ष दिले. "
जवानांच्या मुलांना सेहवाग करणार शिक्षणासाठी मदत
या शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी भारताचा माजी तडफदार फलंदाज वीरेंद्र सेहवाग पुढे आला आहे. या शहीद जवानांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलण्याबाबत सेगवागने एक ट्विट केले आहे. सेहवागने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " शहीद जवानांसाठी आपण जेवढे करू तेवढे कमीच आहे. पण शहीद झालेले जे जवान आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी मात्र आपण घेऊ शकतो. सेहवाग आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये जर शहीद जवांनाच्या मुलांनी प्रवेश घेतला तर ते माझे सौभाग्य असेल. "
शहिद कुटुंबियांच्या मदतीसाठी विदर्भाकडून इनामाची रक्कम
सलग दुसऱ्या वर्षी रणजीपाठोपाठ इराणी करंडक जिंकण्याचा मान विदर्भाच्या संघाने पटकावला आहे. विदर्भाचा संघ फक्त इतक्यावरच थांबला नाही, तर या विजयानंतर मिळालेली इनामाची रक्कम त्यांनी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्याचे जाहीर केले आहे. गुरवारी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. यामध्ये भारताच्या ४० जवानांना शहीद व्हावे लागले होते. या हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहीदांच्या कुटुंबियांना मदत करायचे विदर्भाच्या संघाने ठरवले आहे. त्यानुसार त्यांनी ही घोषणा केली आहे.
Web Title: Shikhar Dhawan will also helping the family of Shaheed Jawans, see the video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.