Join us  

शिखऱ धवन पुन्हा बनणार भारताचा कर्णधार! राष्ट्रीय संघाबाहेर असलेल्या खेळाडूंना संधी देण्यावर असेल भर

Shikhar Dhawan: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३चे आयोजन चीनमध्ये २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. स्पर्धांमध्ये क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 6:28 AM

Open in App

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३चे आयोजन चीनमध्ये २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. स्पर्धांमध्ये क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे. मीडिया वृत्तानुसार, बीसीसीआय  पुरुष आणि महिला दोन्ही संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत पाठवणार आहे. क्रिकेट स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये आयोजित केली जाईल.

आशियाई क्रीडा स्पर्धा होत असतानाच वनडे विश्वचषकही भारतात खेळल्या जाणार आहे. अशा स्थितीत पुरुष ब संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाठविला जाईल.  बीसीसीआय शिखर धवनला या संघाचा कर्णधार बनवू शकते. शिखर धवन टीम इंडियातून बाहेर पडला असला तरी तो आशियाई क्रीडा स्पर्धेत पुनरागमन करू शकतो. ३० जूनपूर्वी बीसीसीआय भारतीय ऑलिम्पिक संघटनेला खेळाडूंची यादी पाठवेल. हीच यादी आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी पाठवू शकतात.

शिखर धवनने  कारकिर्दीत  ३४ कसोटी, १६७ वनडे आणि ६८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये त्याने सात शतके आणि पाच अर्धशतकांसह २,३१५ धावा केल्या आहेत. वन डेत त्याची १७ शतके असून  ६,७९३ धावा आहेत. धवनने यापूर्वी ‘ब’ संघाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळेच आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण जिंकून देण्याची जबाबदारी शिखरच्या खांद्यावर टाकली जाईल, अशी चिन्हे आहेत.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असेल. २०१० मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता आणि २०१४ च्या आवृत्तीचाही भाग होता. मात्र भारताने या स्पर्धेत आपले दोन्ही संघ पाठवले नव्हते.

२०१८ मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश  नव्हता. यावेळी बीसीसीआयने दोन्ही संघ न पाठविण्याची आधी भूमिका घेतली होती, मात्र दोन दिवसांआधी ‘यू टर्न’ घेत संघ पाठविण्यास होकार दिला.

टॅग्स :शिखर धवनभारतीय क्रिकेट संघ
Open in App