रोहित नाईक, वरिष्ठ उपसंपादक
शिवाजी पार्क मैदानाच्या परिसरात असलेल्या शिवाजी पार्क जिमखान्याने (एसपीजी) अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू घडविले आहेत. १९०९ साली स्थापन झालेल्या या जिमखान्याने आतापर्यंत २० हून अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दिले आहेत. पूर्वी प्रामुख्याने क्रिकेट अशी ओळख असलेल्या एसपीजीमध्ये आज अनेक खेळांचा सराव केला जातो.
११२ वर्षांचा इतिहास असलेल्या एसपीजीचे मुंबई क्रीडा क्षेत्रात मानाचे स्थान आहे. क्रिकेट हा जिमखान्याचा आत्मा असला तरी येथे टेनिस, बिलियर्ड, कार्ड्स, टेबल टेनिस आणि कॅरम हे खेळही खेळले जातात. येत्या काळात एसपीजीमध्ये तायक्वांदो खेळाचे आगमन होणार आहे. ६ ते ८ हजार स्केअर फूट परिसरात पसरलेल्या एसपीजीच्या प्रांगणामध्ये शेकडो खेळाडू आपले कौशल्य आजमावतात.
या कार्यक्रमांचेही होते आयोजनयंदाच्या वर्षी होलिकोत्सव कार्यक्रमाने एसपीजीचा परिसर चांगलाच गाजला होता. त्याचप्रमाणे दरवर्षी दिवाळी संध्या कार्यक्रमाद्वारे एसपीजीचा परिसर चांगलाच उजळून निघतो. सर्वसामान्य नागरिकांसाठी रक्तदान शिबिर, वैद्यकीय शिबिर आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे विविध आजारांवरील चर्चासत्रांचे आयोजन करत एसपीजी परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकीही जपली जाते. यंदा १४ ऑगस्ट रोजी पहिल्यांदाच एसपीजीच्या वतीने खुल्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
व्यवस्थापन मंडळअध्यक्ष : प्रवीण अमरे, उपाध्यक्ष : विक्रम पटवर्धन, विलास साळुंखे, चेअरमन : दीपक मुरकर, व्हाइस चेअरमन : विश्वास नेरुरकर, सरचिटणीस : संजीव खानोलकर, सहायक सरचिटणीस : सुनील रामचंद्रन, खजिनदार : विलास सोमन, क्रिकेट सचिव : सुशांत मांजरेकर, क्रिकेट सदस्य : सिद्धेश किनलेकर, टेनिस सचिव : योगेश परुळेकर, टेनिस सदस्य : चंद्रकांत राऊत, बिलियर्ड्स सचिव : शेखर सुर्वे, कार्ड सचिव : अजय पाटणकर, इनडोअर गेम्स सचिव : विजय अलवा, कँटीन सचिव : आशुतोष जोगळेकर, कमिटी सदस्य : संकेत बापट, कमिटी सदस्य : समीर भोबे.
एसपीजीच्या वतीने ११, १६ आणि १९ वर्षांखालील अशा तीन वयोगटांच्या खेळाडूंसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते. यासाठी दरवर्षी निवड चाचणी शिबिराचे आयोजनही होते. या प्रतिष्ठेच्या क्लबकडून खेळण्यासाठी केवळ मुंबईच नाही, तर मुंबई बाहेरुनही अनेक नवोदित क्रिकेटपटू स्वत:ला सिद्ध करण्यासाठी घाम गाळतात. या निवड शिबिरासाठी तब्बल ८०० हून अधिक नवोदित क्रिकेटपटू आपले कौशल्य सादर करतात. मात्र, प्रत्येक वयोगटातून केवळ २०-२१ खेळाडूंची एसपीजी संघात निवड होते आणि मोफत तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते.- सुनील रामचंद्रन (रमनी), सहायक सरचिटणीस
क्रिकेटच्या अनेक स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या एसपीजीद्वारे टेनिस, कॅरम, बुद्धिबळ आणि योगा यांच्याही स्पर्धा आणि शिबिरांचे आयोजन होते. दादा खानोलकर मेकर्स अँड कोचेस टेनिस स्पर्धा ही एसपीजीच्या वतीने आयोजित होणारी मानाची स्पर्धा आहे. यामध्ये अनेक राज्य व राष्ट्रीय टेनिसपटू सहभागी होतात. महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या मान्यतेने होणारी राज्य मानांकन कॅरम स्पर्धाही एसपीजीमध्ये रंगते. यामध्ये राज्यभरातून ७००-८०० खेळाडू सहभागी होत असतात. कॅरममध्येही कारकीर्द घडू शकते याचा आत्मविश्वास एसपीजीच्या स्पर्धेद्वारे नक्कीच मिळतो. टेबल टेनिसमध्येही आंतर क्लब लीगचे आयोजन एसपीजीच्या वतीने होते.