मुंबई : सलामीच्या सामन्यात झालेला पराभव मागे टाकून शिवाजी पार्क लायन्स संघाने आपल्या दुस-या सामन्यात ट्रिम्प नाइट्स मुंबई नॉर्थ इस्ट संघाचा ७ बळींनी धुव्वा उडवला. या दिमाखदार विजयासह शिवाजी पार्क संघाने टी२० मुंबई लीग स्पर्धेत आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. शिवम दुबेने नॉर्थ इस्टचा अर्धा संघ बाद करत सामना शिवाजी पार्कच्या बाजूने झुकविला. वानेखेडे स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या या सामन्यात शिवाजी पार्क संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि नॉर्थ इस्ट संघाला १५२ धावांत गुंडाळले. यानंतर जबरदस्त फलंदाजी करताना शिवाजी पार्कने केवळ ३ फलंदाजांच्या मोबदल्यात ५ चेंडू राखून विजयी लक्ष्य गाठले. ब्राविश शेट्टीने शिवाजी पार्कच्या विजयात निर्णायक भूमिका बजावताना सलग दुस-या सामन्यात आक्रमक अर्धशतक झळकावले. त्याने ५१ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ६० धावा काढत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
यष्टीरक्षक सुफियन शेख (२) झटपट परतल्यानंतर ब्राविशने हार्दिक तामोरे (१४ चेंडूत १५ धावा) आणि कर्णधार सिध्देश लाड (२२ चेंडूत ३० धावा) यांच्यासह संघाला सावरले. हे दोघेही ठराविक अंतराने बाद झाल्यानंतर शिवम दुबेने २३ चेंडूत २ चौकार व ४ षटकारांची आतषबाजी करत नाबाद ४७ धावा कुटल्या. ब्राविश - शिवम यांनी नाबाद ६३ धावांची विजयी भागीदारी करत संघाचा पहिला विजय साकारला. विनायक भोईर (२/११) याचा अपवाद वगळता नॉर्थ इस्टच्या कोणत्याही गोलंदाजाला चमक दाखवता आली नाही. तत्पूर्वी, शिवम दुबेने भेदक मारा करत २४ धावांत ५ बळी घेत नॉर्थ इस्ट संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडले. प्रफुल वाघेला (४२), सुमित घाडिगावकर (३६) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (३५) यांच्या जोरावर नॉर्थ इस्टने आक्रमक व भक्कम सुरुवात केली होती. मात्र, दहाव्या षटकात शुभमने घाडिगावकरला बाद केल्यानंतर नॉर्थ इस्ट संघाच्या फलंदाजीला गळती लागली. त्याने प्रफुल व सूर्यकुमार यांनाही बाद करुन शिवाजी पार्कला सामन्यावर पकड मिळवून दिली. यानंतर दडपणाखाली आलेल्या नॉर्थ इस्टचे फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाही आणि संपूर्ण संघ १५२ धावांत बाद झाला. शाम्स मुलानी याने ३८ धावांत २ आणि रौनक शर्माने एक बळी घेत शुभमला चांगली साथ दिली.
संक्षिप्त धावफलकट्रिम्प नाइट्स मुंबई नॉर्थ इस्ट : १९.५ षटकात सर्वबाद १५२ धावा. (प्रफुल वाघेला ४२, सुमित घाडिगावकर ३६, सूर्यकुमार यादव ३५; शिवम दुबे ५/२४) पराभूत वि. शिवाजी पार्क लायन्स : १९.१ षटकात ३ बाद १५७ धावा. (ब्राविश शेट्टी नाबाद ६०, शिवम दुबे ४७; विनायक भोईर २/११)