अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील शिवम दुबेच्या ( Shivam Dube) उल्लेखनीय कामगिरीने भारताचा फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin ) याला प्रभावीत केले आहे. त्यामुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात शिवम दुबेला संधी मिळायला हवी, असे स्पष्ट मत अश्विनने व्यक्त केले आहे. शिवमने अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत सलग दोन अर्धशतकं झळकावून ३-० अशा विजयात सिंहाचा वाटा उचलला. शिवाय त्याने गोलंदाजीत सुरेख खेळ करताना दोन विकेट्सही घेतल्या.
दुबेने मालिकेत अष्टपैलू कामगिरी केली आणि त्याला अश्विनने फुल सपोर्ट दिला आहे. अश्विनने त्याची तुलना भारतीय क्रिकेटचा दिग्गज युवराज सिंग याच्याशी केली आहे. "हार्दिक पांड्या हा या भारतीय संघाचा एक महत्त्वाचा सदस्य आहे. पण, शिवम दुबेचा उदय म्हणजे... ज्याप्रमाणे आपण युगानुयुगे ख्रिस्तपूर्व आणि ख्रिस्तनंतरची विभागणी करतो, त्याचप्रमाणे आपण त्याची कारकीर्द 'सीएसकेपूर्वी' आणि 'सीएसकेनंतर' अशी विभागणी करू शकतो. वेस्ट इंडिजमधील परिस्थिती ही CSK परिस्थिती आहे, तो फिरकीपटूंवर फटकेबाजी करणारा फलंदाज आहे,"असे अश्विनने त्याच्या YouTube चॅनेलवर म्हटले.
"मी त्याला अभिमानाने 'युवराज सिंग लाइट' पॅकेज म्हणू शकतो. युवराजसारखे अनेक साम्य मला त्याच्या खेळात दिसत होते. मी असे म्हणत नाही की तो युवराजसारखा आहे. पण, तो मला त्याची खूप आठवण करून देतो, " असेही तो पुढे म्हणाला. "जेव्हा सूर्यकुमार यादव एका टोकाला खेळत असतो, तेव्हा एखादा संघ डावखुरा फिरकीपटू खेळवून त्याला दाबण्याचा प्रयत्न करू शकतो. या टप्प्यावर शिवम दुबे महत्त्वाचा ठरू शकतो. तो संघासाठी जबरदस्त पर्याय आहे. तो त्याच्या कोट्यातील दोन षटकेही टाकू शकतो. तो कटर गोलंदाजी करू शकतो, हे त्याने सिद्ध केले आहे,” असेही अश्विनने सांगितला.
हार्दिक पांड्याचे कमबॅक कधी?
हार्दिक पांड्या सध्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून आहे. त्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे पांड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेचा भाग होऊ शकला नाही. वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिकचा पाय मुरगळला होता आणि त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील मालिकाही खेळला नाही.