भारतीय संघाने नवीन वर्षातील पहिल्याच सामन्यात श्रीलंकन संघाचा २ धावांनी पराभव केला. मुंबईतील वानखेडे मैदानावर श्रीलंकेच्या फलंदाजांना धुळ चारणारा वेगवान गोलंदाज शिवम मावी या सामन्याचा हिरो ठरला. नोएडा येथील रहिवासी असलेल्या शिवम मावीने या सामन्यात २२ धावांत ४ विकेट्स घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
पदार्पणाच्या सामन्यात हिरो ठरलेल्या शिवम मावीला या संधीसाठी तब्बल ६ वर्षे वाट पाहावी लागली. २४ वर्षीय शिवम मावीला आता टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आणि त्याने त्या संधीचे सोनेही केले. त्याने 2018 मध्ये आयपीएल आणि प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये पदार्पण केले. दमदार कामगिरीमुळेच त्याला २०१८ मध्ये अंडर १९ विश्वचषक सामन्यात स्थान मिळालं. तेव्हा पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विजय मिळवला होता. अंतिम सामन्यातही शिवम मावीनं एक विकेट घेतली होती.
‘हार्दिकनं सकारात्मक ठेवलं’“मी सहा वर्ष वाट पाहिली होती. दुखापतीमुळे मला मी दूर राहिन असे वाटत होते. हार्दिक भाईकडून डेब्यू कॅप मिळणे स्वप्न साकार होण्यापेक्षा कमी नाही. आपल्या संघासाठी खेळणे आणि चांगली कामगिरी करणे हे स्वप्न सर्वांचेच स्वप्न असते. हार्दिक भाईनं मला सकारात्मक ठेवलं आणि सातत्यानं माझ्याशी चर्चा केली. माझी पहिली विकेट माझ्यासाठी आवडती होती, कारण मी त्याला त्रिफळाचित केले,” असे शिवम म्हणाला.
नोएडामध्ये कुटुंबशिवम हा नोएडाचा रहिवासी आहे. त्याचे कुटुंब मूळचे मेरठचे. परंतु आपण २२ वर्षांपासून नोएडामध्ये राहत असल्याचे त्याचे वडील पंकज मावी यांनी सांगितले. नोकरीनिमित्त शिवमचे वडील नोएडामध्ये स्थायिक झाले. परंतु शिवमची क्रिकटमधील आवड पाहून आपण कधी तो आंतरराष्ट्रीय स्टार बनेल असे वाटलेही नसल्याचे ते म्हणाले. त्याने अतिशय मेहनत केली. लहानपणापासूनच क्रिकेट त्याचा आवडता खेळ होता. त्याला अभ्यास आणि क्रिकेट दोन्ही सांभाळावे लागत होते, असंही शिवमच्या वडिलांनी सांगितले.