Join us  

२००१ नंतर मुस्लिमांना अनेकदा वर्णद्वेषाचा सामना करावा लागला; मोहम्मद सिराज प्रकरणावर शोएब अख्तर म्हणतो...

अनेकदा आम्हाला विचारलं जातं तुम्ही कुठून आलात... आम्ही पाकिस्तान सांगितलं की, ते लगेच म्हणतात ओसामा बिन लादेनचा देश - शोएब अख्तर

By स्वदेश घाणेकर | Published: January 12, 2021 8:14 AM

Open in App

India vs Australia यांच्यातल्या सिडनी कसोटीत ( Sydney Test) भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) याला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. कसोटीच्या तिसऱ्या व चौथ्या दिवशी सिराज व जसप्रीत बुमराह यांच्यावर ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांनी वर्णद्वेषी शेरेबाजी केली. सामन्याच्या चौथ्या दिवशी पुन्हा शेरेबाजी झाल्यानं सिराजनं मैदानावरील अम्पायर्सकडे तक्रार केली आणि हुल्लडबाज प्रेक्षकांना स्टेडियममधून बाहेर काढेपर्यंत अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) सामना थांबवून ठेवला. पोलिसांच्या कारवाईनंतर सामना पुन्हा सुरू झाला. प्रेक्षकांच्या या थिल्लरपणाचा सर्वांना निषेध केला. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shaoib Akhatar) यानेही त्याला अनुभवायला लागलेला असा प्रसंग सांगितला.

शोएबनं त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात त्यानं म्हटलं की,''९/११च्या नंतर २००१मध्ये मुस्लिमांना अनेकदा वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. जर त्या हल्ल्यात ६० आतंकवाद्यांचा सहभाग होता, तर मग १६० कोटी मुस्लिमांना त्याचा रोष सहन करावा लागला. आंतरराष्ट्रीय मीडियानं या घटनेला असा रंग दिला की त्यांनी १६० कोटी मुसलमानांच दहशतवादी बनवलं.''

''फुटबॉलमध्ये मी पाहिलंय की कृष्णवर्णीयांवर प्रेक्षक नेहमी शेरेबाजी करतात. त्यांच्यावर केळं फेकलं जातं, एखाद्या प्राण्याच्या नावावरून त्यांना बोलवलं जातं. प्रत्येक गोष्ट अल्लाहनं बनवली आहे आणि प्रत्येक माणूसही त्यानंच बनवला आहे. त्यामुळे त्यांचा तुम्ही अपमान करू शकत नाही. मलाही अशा शेरेबाजीचा सामना करावा लागला. अनेकदा आम्हाला विचारलं जातं तुम्ही कुठून आलात... आम्ही पाकिस्तान सांगितलं की, ते लगेच म्हणतात ओसामा बिन लादेनचा देश,''असेही अख्तर म्हणाला.  

त्यानं पुढे सांगितले की,''क्रिकेटच्या मैदानावर आम्हाला दहशतवादी म्हणून बोलावले गेले आहे. २००२मध्ये आम्हाला असा अनुभव आला. मी त्या देशाचं नाव सांगणार नाही. मोहम्मद सिराजसोबत जे झालं ते चुकीचं होतं. ऑस्ट्रेलिया वर्णद्वेषी देश नाही. मी तिथे अनेकदा गेलो आहे. काही लोकंच अशी शेरेबाजी करतात. ९९ टक्के ऑस्ट्रेलियावर माझं प्रेम आहे. पण फक्त १ टक्के लोकांमुळे हा देश बदनाम होत आहे.''

पाकिस्तान क्रिकेट मंडळानं BCCIसोबत काम करायला हवंBCCIनं याबाबत कठोर कारवाई करायला हवी. BCCI आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळ यांनी या एका गोष्टीसाठी एकत्र यायला हवं. अशा घटना खपवल्या जाणार नाही, असं या दोघांनी जगाला सांगायला हवं, असेही अख्तर म्हणाला.  

पाहा व्हिडीओ... 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाशोएब अख्तरबीसीसीआय