कराची : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने अँकरसोबत झालेल्या वादामुळे टीव्ही कार्यक्रमात चक्क अर्ध्यात बहिष्कार टाकला. सरकारचे नियंत्रण असलेल्या पीटीव्हीवर शोएब क्रिकेट विश्लेषक होता. त्याने आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.
शोएबने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पाकने विश्वचषकात न्यूझीलंडवर विजय मिळविल्यानंतर झालेल्या टीव्ही शोमध्ये अँकर नौमान नियाझ यांनी वाईट वागणूक दिली. यावर ४६ कसोटी आणि १६३ वनडे खेळलेला शोएब तडक उठला. त्याने माईक काढला आणि बाहेरचा रस्ता धरला. अँकरने त्याला थांबविण्याचा प्रयत्नदेखील केला नाही. यानंतरही कार्यक्रम सुरूच होता. यावेळी सहभागी असलेले विव्हियन रिचर्ड्स, डेव्हिड गॉवर, राशिद लतिफ, उमर गूल, आकिब जावेद तसेच महिला संघाची कर्णधार सना मीर हे सर्वजण स्तब्ध झाले. अख्तरने कार्यक्रम सोडल्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. लोकांनी निजाझला माफी मागण्यास सांगितले. अख्तरने बुधवारी आपली बाजू मांडली.
अख्तर म्हणाला, ‘नौमानने माझ्यासोबत असभ्य वर्तन केले. त्याने कार्यक्रम सोडून जाण्यास सांगितले. अनेक दिग्गज सोबत असल्याने माझ्यासाठी तो क्षण अपमानास्पद होता. मी तणाव निवळण्यासाठी प्रयत्नदेखील केले, पण नौमानने माफी मागण्यास नकार दिला. यानंतर माझ्याकडे पर्याय नव्हता.’
नेमके काय घडले?
नौमान यांनी शोएबला एक प्रश्न विचारला, तेव्हा शोएबने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. उलट वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ तसेच पीएसएलमधील लाहोर कलंदर्सचे त्याचे प्रशिक्षक आकिब जावेद यांची प्रशंसा केली. नौमानने त्याला चिडून थांबविण्याचा प्रयत्न केला. ‘तू माझी दखल घेत नाहीस, हे खपवून घेतले जाणार नाही, तू कार्यक्रम सोडून जाऊ शकतोस,’ असा शोएबला इशारा दिला. यानंतर लगेचच ब्रेक घेण्यात आला. शोएबने काही क्षणानंतर सर्व तज्ज्ञांची माफी मागितली आणि आपण पीटीव्ही स्पोर्ट्सचा राजीनामा देत असल्याचीही घोषणा केली.
Web Title: Shoaib Akhtar boycotts TV show!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.