नवी दिल्ली : आयसीसी वन डे विश्वचषक २०२३ मध्ये पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव झाला. बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ६२ धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कांगारूंनी ९ बाद ३६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ४५.३ षटकांत ३०५ धावांत गारद झाला. पाकिस्तानकडून अब्दुल्ला शफीक (६८), इमाम-उल-हक (७०) आणि मोहम्मद रिझवान (४६) वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून मात्र डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी शतकी खेळी करून शेजाऱ्यांची चांगलीच धुलाई केली. पाकिस्तानच्या पराभवानंतर बोलताना माजी खेळाडू शोएब अख्तरने मोठी भविष्यवाणी केली आहे. पाकिस्तानी संघाची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता कमी असल्याचे अख्तरने म्हटले आहे.
शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले, "हा निराशाजनक पराभव आहे. याबद्दल काय म्हणता येईल? काय करता येईल? मला काहीच सांगता येत नाही? पण तरीही मी पाकिस्तानी संघाला पाठिंबा देईन. तुम्ही काहीही म्हणा पण ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पराभव नक्कीच लाजिरवाणा आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर बाबर आझमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला? मला विचारायचे आहे की या निर्णयामागील कारण काय होते? जर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली असती तर त्यांनी ३२० किंवा ३३० धावा केल्या असत्या. त्यामुळे पाकिस्तानी गोलंदाजांना बचावाची संधी दिली मिळाली असती. पण बाबर आझमने असे काहीच होऊ दिले नाही. बाबर हा महान खेळाडू आहे. मोठ्या खेळाडूंना मोठ्या सामन्यांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची गरज आहे."
शोएब अख्तरची मोठी भविष्यवाणी
तसेच आताच्या घडीला पाकिस्तानची स्थिती बिकट आहे. कारण उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. पाकिस्तानचा सामना आगामी काही दिवसांत अफगाणिस्तानशी होईल, त्यामध्ये मोठा विजय मिळेल अशी आशा आहे. पण, अफगाणिस्तानचा संघ देखील तगडा आहे अनेकदा त्यांनी पाकिस्तानविरूद्ध याचा प्रत्यय दाखवून दिला आहे. याशिवाय मला वाटते पाकिस्तानने अफगाणिस्तानविरूद्धचा सामना देखील गमावला तर परिस्थिती फारच हाताबाहेर जाईल, असेही अख्तरने यावेळी सांगितले.
पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग
पाकिस्तानला उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी उरलेले सर्व पाच सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. एका सामन्यातील पराभवामुळे देखील पाकिस्तानचा खेळ बिघडू शकतो. उरलेले पाचही सामने जिंकल्यास पाकिस्तानचे एकूण गुण १४ होतील, ज्यामुळे संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहील. दरम्यान, पाकिस्तानने ५ पैकी ४ सामन्यात विजय मिळवल्यास देखील पाकिस्तानचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. कारण ४ सामने जिंकल्यानंतर पाकिस्तानचे गुण १२ होतील. मात्र, त्यासाठी पाकिस्तानला आपल्या नेटरनरेटमध्ये सुधारणा करावी लागेल.
Web Title: Shoaib Akhtar comments on semi final tie after Australia beat Pakistan in pak vs aus match in icc odi world cup 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.