कोरोना व्हायरसमुळं जगभरात संकट आले आहे. अशा परिस्थितीत आपापसातील हेवेदावे विसरून एकजुटीनं काम करण्याची गरज आहे. भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आणि फिरकीपटू हरभजन सिंग यांनी त्याची प्रचिती घडवली. पाकिस्तानातील गरिबांना जीवनावश्यक वस्तू पुरवणाऱ्या शाहिद आफ्रिदीचे त्यांनी कौतुक केलं. इतकेच नाही त्यांनी आफ्रिदीच्या समाजकार्याला मदत करण्याचंही आवाहन केलं. पण, त्यांचं हे आवाहन काहींच्या पचनी पडलं नाही आणि नेटिझन्सनी त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर ट्रेंड सुरू केला. पण, युवी आणि भज्जीच्या मदतीसाठी पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर पुढे आला आहे.
रावळपिंडी एक्स्प्रेसनं युवी आणि भज्जीला ट्रोल करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. तो म्हणाला,''युवी आणि भज्जीवर टीका करणे अमानवी आहे. या काळात देश आणि धर्मापेक्षा मानवता महत्त्वाची आहे. युवी आणि भज्जी यांनी हेच लक्षात ठेवून आफ्रिदी फाऊंडेशनला मदत करण्याचं आवाहन केलं.''
''भारतीयांकडून मला प्रचंड प्रेम मिळालं आहे. भारताकडून मला मिळणाऱ्या मिळकतीतील 30 टक्के रक्कम मी माझ्यासोबत काम करणाऱ्या टीव्ही क्षेत्रातील कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये वाटणार आहे,'' असेही अख्तर म्हणाला.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमधील द्वंद्व जगजाहीर आहे. पाकिस्तानातून दहशतवादी कुरापतींना मिळणाऱ्या खतपाणीमुळे भारतानं शेजाऱ्यांशी सर्व संबंध तोडले आहेत. त्यामुळेच उभय देशांमध्ये तेरा वर्षांपासून द्विदेशीय क्रिकेट मालिका झालेली नाही. पण, सध्या कोरोना व्हायरसनं जगाला वेठीस धरलं आहे आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी भारत-पाकिस्ताननं क्रिकेट मालिका खेळवावी, असा प्रस्ताव अख्तरने ठेवला आहे.
तो म्हणाला,''हा संकटाचा काळ आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेचा प्रस्ताव मला ठेवायचा आहे. पण, या सामन्यातून दोन्ही देशांतील चाहते एकमेकांच्या पाठिशी उभे राहतील. विराटनं शतक झळकावलं तर आम्ही आनंद साजरा करू, तसेच बाबरनं शतक झळकावल्यास तुम्ही आनंद साजरा करा. मैदानावरील निकालापेक्षा दोन्ही सघ विजयी ठरतील. या सामन्याला मोठी व्ह्यूअर्सशीप मिळेल. इतिहासात प्रथमच दोन्ही संघ एकमेकांसाठी खेळतील. यातून उभा राहणारा निधी दोन्ही देशांना समान दिला जाईल.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
इशांत शर्माची पत्नी भडकली; काँग्रेस नेत्याला सुनावले खडेबोल, केले ब्लॉक!