कराची : पाकिस्तानातील अल्पसंख्यांकावर अनन्वित अत्याचार सुरू असल्याचे आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदू मुलीच्या हत्येची घटना खळबळ माजविणारी आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांताच्या घोतकी भागात एक हिंदू मुलीचा डेंटल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये मृतदेह आढळून आला आहे. लरकाना भागामध्ये असिफा मेडिकल डेंटल कॉलेज आहे. या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये सोमवारी ही मुलगी मृत आढळली. तिचा मृत्यू रस्सीने गळा आवळल्याने झाला आहे. कॉलेज प्रशासनाने हत्येचे वृत्त फेटाळले असून तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं आता या प्रकरणावर भाष्य केले आहे.
घोतकीमध्ये कट्टरवाद्यांकडून मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणानंतर हिंदू तरुणीची हत्या झाली आहे. हा वाद हायस्कूलचा एक हिंदू शिक्षक ईशनिंदा याने केल्याच्या कथित आरोपामुळे सुरू झाला होता. त्यानंतर कट्टरवाद्यांनी या शाळेची आणि हिंदू मंदिरांची तोडफोड केली होती. या विद्यार्थीनिचे नाव नमृता चंदानी असे आहे. ती बीडीआसच्या शेवटच्या वर्षाला होती. तिचा मृतदेह गळ्याला रस्सी बांधलेला अंथरुणावर पडलेला होता. कॉलेज प्रशासन तिने आत्महत्या केल्याचे भासवत असून पुरावे मात्र हत्येकडे बोट दाखवत आहेत.
घटनास्थळावर असे पुरावे सापडले आहेत की, नमृताने बचावासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. एवढेच नाही तर तिचा मोबाईलही गाय़ब होता, तो नंतर पोलिसांनी शोधला. यामुळे संशयाला जागा मिळाली असून जर तिने आत्महत्या केली तर तिचा मृतदेह अंथरुणावर कसा काय आढळला. तिचा मृतदेह लटकलेला असायला हवा होता. नमृताचा भाऊही डॉक्टर आहे. त्याने सांगितले की तिच्या गळ्यावर दोरीचे व्रण होते. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, यासाठी लोकांनी पाठिंबा द्यायला हवा.
या प्रकरणावर अख्तरनं ट्विट केलं की,''निर्दोष मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या वृत्तानं मन कासावीस झालंय. आशा करतो की तिला न्याय आणि गुन्हेगारांना शिक्षा मिळेल. तिच्या आत्म्याला शांती मिळो.''
Web Title: Shoaib Akhtar demands justice for Nimrita Kumari
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.