shaoibh Akhtar news : पाकिस्तानचाइंग्लंडने एक डाव आणि ४७ धावांनी पराभव केल्यानंतर माजी खेळाडू शोएब अख्तरने संताप व्यक्त केला. अख्तरने पाकिस्तानी संघातील खेळाडू, निवडकर्त्यांसह पाकिस्तान क्रिकेट बोर्डाले लक्ष्य केले. पाकिस्तान क्रिकेटमध्ये मागील एका दशकापासून विचित्र परिस्थिती आहे. तुम्ही पेराल तेच उगवेल हे आता स्पष्ट झाले असल्याचे अख्तरने सांगितले. सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकून पाहुण्या इंग्लिश संघाने विजयी सलामी दिली.
पीटीव्ही स्पोर्ट्सशी बोलताना अख्तर म्हणाला की, पराभव झाला हे समजू शकतो पण परिस्थिती फारच वाईट आहे. हार जीत होत असते पण लढत होणे गरजेचे असते. पाकिस्तानने काहीच संघर्ष केला नाही. मागील दोन दिवस इंग्लंडचा संघ यजमानांवर तुटून पडला. इंग्लंडने ८०० हून अधिक धावा कुटल्या. काही दिवसांपूर्वी बांगलादेशसारख्या संघाने देखील पाकिस्तानचा पराभव केला होता.
"जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतून (WTC) पाकिस्तानला बाहेर काढावे असे चाहते म्हणत आहेत. आयसीसीने यावर बारकाईने विचार करण्याची गरज आहे. पाकिस्तान दौऱ्यावर संघ पाठवण्यापूर्वी कसोटी क्रिकेट जिवंत राहिल याची दक्षता घ्यावी. पाकिस्तानच्या चाहत्यांना हा पराभव न पचणारा आहे. चाहत्यांसह युवा खेळाडू याकडे पाहून काय विचार करत असतील. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा गोंधळ लवकर संपवावा अशी मी मागणी करतो", असेही शोएब अख्तरने नमूद केले.
अख्तर पुढे म्हणाला की, संघाचे व्यवस्थापन आणि कर्णधार कमजोर असेल तर खेळाडूंमध्ये एक वेगळा चमू तयार होणारच. कर्णधारच स्वार्थी असेल तर अशा घटना घडतात. प्रशिक्षक कर्णधाराला घाबरुन निर्णय घेत असतील तर कशाची अपेक्षा करायची. मी पाकिस्तानसाठी खेळायचो तेव्हापासून ही संस्कृती सुरू आहे.