नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. आता अख्तरने त्याची इच्छा व्यक्त करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष व्हायची इच्छा असल्याचे शोएब अख्तरने म्हटले आहे. याशिवाय या पदावर राहून देशासाठी अनेक सुपरस्टार बनवणार असल्याचे देखील त्याने सांगितले. पाकिस्तानी संघाने खराब कामगिरी केल्यानंतर टीका करणारा अख्तर आता पाकिस्तानातील सुपरस्टारच्या शोधात असल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे.
मला पाकिस्तान क्रिकेटची सेवा करायची आहे - अख्तर
शोएब अख्तरने पाकिस्तानच्या सुनो टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत पीसीबीचा अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने म्हटले, "मला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष व्हायचे आहे आणि पाकिस्तानमध्ये अनेक सुपरस्टार बनवायचे आहेत. मला माझ्या देशासाठी 50 सुपरस्टार बनवायचे आहेत. यानंतर मी ही संख्या 100, 200 आणि 2000 पर्यंत वाढवीन. मी पाकिस्तान क्रिकेटचा ऋणी आहे त्यामुळे मला पाकिस्तानची सेवा करायची आहे."
या मुलाखतीत शोएब अख्तरने बाबर आझमने त्याच्या बोलण्याच्या कौशल्यावर काम न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. बाबर हा देशातील सर्वात मोठा ब्रँड बनू शकतो, असे त्याला वाटते, मात्र इंग्रजी येत नसल्याने तो मागे राहिला असल्याचे अख्तरने सांगितले. तसेच गॅंगस्टर या चित्रपटात मला मुख्य भूमिका करण्याची ऑफर होती असा खुलासा अख्तरने केला.
शोएब अख्तरचा मोठा खुलासा
"2005 मध्ये जेव्हा प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री मीराने मला सांगितले की, हिंदी चित्रपटांचे प्रख्यात दिग्दर्शक महेश भट मला भेटू इच्छित आहेत. मी कराचीत क्रिकेट शिबिरात गेलो होतो आणि ते चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन आले होते. गँगस्टर या चित्रपटात मी भूमिका करावी अशी महेश भट यांची इच्छा होती. ही एक उत्तम स्क्रिप्ट होती आणि मी नेहमीच चित्रपटांचा आनंद लुटला आहे, पण काही कारणास्तव मी ही भूमिका स्वीकारली नाही", असे शोएब अख्तरने सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Shoaib Akhtar has expressed his desire to become the president of Pakistan Cricket Board to produce many superstars
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.