इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला सुरुवात झाली. लखनौ व गुजरात या दोन नव्या संघाच्या एन्ट्रीने स्पर्धेचं फॉरमॅट बदलले आणि जेतेपदासाठीची चुरस आणखी वाढली आहे. आयपीएल ही जगातील सर्वोत्तम फ्रँचायझी लीग आहे आणि हे कुणीही नाकारू शकत नाही. पण, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड IPL ला टक्कर देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आयपीएलच्या धर्तीवर त्यांनी पाकिस्तान सुपर लीग सुरू केली आणि आता PSLमध्ये ऑक्शन पद्धत आणण्याचा निर्धार PCB अध्यक्ष रमीज राजा यांनी बोलून दाखवला आहे. पण, पाकिस्तानचे माजी खेळाडूंना त्यांच्या देशातील खेळाडूंना IPL मध्ये खेळताना पाहायचेय आणि त्यामुळेच ते दावे करत सुटले आहेत.
पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर यानेही बाबर आजम ( Babar Azam) व विराट कोहली यांना आयपीएलमध्ये एकत्र खेळताना पाहायला आवडेल, असे मत व्यक्त केले. तो इथेच थांबला नाही, तर पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आजमने आयपीएल लिलावात १५-२० कोटी सहज घेतले असते असा दावाही त्याने केला. आयसीसीच्या वन डे व ट्वेंटी-२० क्रमवारीत बाबर आजम अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तानचे ११ खेळाडू आयपीएल २००८मध्ये खेळले होते, त्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंवर आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातली गेली आहे.
शोएब अख्तर म्हणाला, आयपीएलमध्ये विराट कोहली व बाबर आजम या दोघांना सोबत डावाची सुरुवात करणाना पाहणे, सुखावणारे असेल. तो क्षण किती आनंदाचा असेल. आयपीएल ऑक्शनमध्ये बाबरला १५-२० कोटी सहज मिळाले असते आणि तो पाकिस्तानचा सर्वात महागडा खेळाडू ठरला असता.
बाबरने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ७३ सामन्यांत ४५.१७च्या सरासरीने २६२० धावा केल्या आहेत. त्यात २५ अर्धशतकं व १ शतकाचा समावेश आहे.