IND vs PAK : आशिया चषकात यजमान पाकिस्तानला भारताकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाने सांघिक खेळीच्या जोरावर २२८ धावांनी मोठा विजय मिळवून पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकांत २ गडी गमावून ३५६ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ३२ षटकांत १२८ धावा करून सर्वबाद झाला. या सामन्यातील पराभवानंतर एकीकडे भारतीय खेळाडू आनंद साजरा करत आहेत, तर दुसरीकडे पाकिस्तानचे माजी खेळाडू बाबर आझमच्या संघावर टीका करत आहेत. अशातच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एक मोठे विधान केले आहे. भारत-पाकिस्तान यांचा सामना अंतिम फेरीत व्हायला हवा असे अख्तरने म्हटले आहे.
भारताकडून विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी जबरदस्त शतके झळकावली. विराट कोहलीने ९४ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद १२२ धावा केल्या. तर, दुखापतीनंतर पहिलाच सामना खेळत असलेल्या राहुलने १०६ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद १११ धावा केल्या. भारताने दिलेल्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांना घाम फुटला. कुलदीप यादवने ५ बळी घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
भारतीय संघ या विजयाचा हकदार होता - अख्तरपाकिस्तानचा पराभव झाला असला तरी दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना व्हायला हवा, असे पाकिस्तानचा माजी खेळाडू अख्तरने नमूद केले. तो त्याच्या यूट्यूब चॅनेलवर सामन्याचे विश्लेषण करत होता. "आता अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने यायला हवेत. भारतीय संघ या विजयाचा हकदार होता. मला भारताची सर्वात चांगली गोष्ट आवडली ती म्हणजे त्याची गोलंदाजी अप्रतिम होती. त्यांना लवकरात लवकर विकेट काढून सामना संपवायचा होता. एक वेगवान गोलंदाज म्हणून मला हे पाहून खूप आनंद झाला", असे अख्तरने सांगितले.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा अंतिम फेरीत भिडण्याची शक्यता आहे. त्यासाठी या दोन्ही संघांना त्यांच्या उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. सुपर ४ मध्ये पाकिस्तानचा एकच सामना शिल्लक आहे आणि अंतिम फेरीत जाण्यासाठी हा सामना जिंकणे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे. तर दुसरीकडे भारताने श्रीलंकेला पराभूत केले तर भारताचे अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित होईल. त्यानंतर श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम फेरीसाठी लढत होईल.