नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) विराट कोहलीबाबत (Virat Kohli) मोठी भविष्यवाणी केली आहे. विराट टी-20 विश्वचषकानंतर (T20 World Cup 2022) क्रिकेटच्या सर्वात लहान फॉर्मेटमधून निवृत्त होण्याचा विचार करू शकते असे अख्तरने म्हटले. अलीकडेच पार पडलेल्या आशिया चषकात विराट कोहलीने शानदार खेळी करून जोरदार कमबॅक केला आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. लक्षणीय बाब म्हणजे या स्पर्धेतील भारताच्या शेवटच्या सामन्यात किंग कोहलीने त्याचे वैयक्तिक 71 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते.
दरम्यान, आशिया चषकाच्या संपूर्ण स्पर्धेत विराटने 5 सामन्यात एकूण 276 धावा केल्या. अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात त्याने 61 चेंडूत 122 धावांची शतकी खेळी केली होती. विराट कोहली ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाचा हिस्सा आहे. मात्र पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने विराट कोहलीशी संबंधित धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. भारताचा हा आघाडीचा फलंदाज निवृत्तीचा विचार करू शकतो, असे त्याने म्हटले आहे.
विराट निवत्ती घेऊ शकतो - अख्तर
इंडिया डॉट कॉमच्या लाईव्ह सेशनमध्ये शोएब अख्तरने म्हटले, "कोहली टी-20 विश्वचषकानंतर टी-20 फॉर्मेटमधून निवृत्त होऊ शकतो. तो इतर फॉरमॅटमधील त्याचे प्रभुत्व वाढवण्यासाठी असे करू शकतो. जर मी त्याच्या जागी असतो तर मीही तेच केले असते", असा दावा शोएब अख्तरने केला आहे.
शाहिद आफ्रिदीने दिला होता निवृत्तीचा सल्ला
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने विराट कोहलीला योग्य वेळेवर निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला होता. "संघाकडून तुम्हाला ड्रॉप केले जाईल अशी वेळ स्वत:वर येऊ देऊ नये. जेव्हा तुम्ही करिअरच्या सर्वोच्च स्थानावर असता तेव्हाच निवृत्ती घ्यायला हवी. अर्थात असे खूपच कमी पाहायला मिळते. खूपच कमी खेळाडू असा निर्णय घेतात. पण विराट कोहली जेव्हा निवृत्तीचा निर्णय घेईल तेव्हा असे करणार नाही. ज्या धडाक्यात कोहलीने करिअरची सुरुवात केली होती तसाच तो आपल्या करिअरचा शेवटही सर्वोत्तम कामगिरीवेळीच करेल", असे शाहिद आफ्रिदी याने पाकिस्तानातील एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.
Web Title: Shoaib Akhtar has said that Virat Kohli may retire from the T20 format after the World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.