कराची - भारतानंतर आता पाकिस्तानातही खेळाडूंच्या जीवनावर बायोपिक (Biopic) बनवणे सुरू झाले आहे. याची सुरुवात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या (Shoaib Akhtar) जीवनावर एक चित्रपटापासून होणार होती. या चित्रपटात गायक-अभिनेता उमर जसवाल (Umair Jaswal) शोएब अख्तरची भूमिका साकारणार असून, यावर्षीच हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, चित्रपटाच्या निर्मात्यासोबत वाद झाल्याने गोलंदाज शोएब अख्तरने चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. रावळपिंडी एक्सप्रेस या चित्रपटापासून मी स्वत:ला वेगळं करत आहे, हे अतिशय दु:खदपणे मी सांगू इच्छितो, असे शोएब अख्तरने ट्विट करुन चाहत्यांना सांगितले आहे.
रावळपिंडी एक्सप्रेस या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून नोव्हेंबर महिन्यात उमरने यासंदर्भात माहिती दिली होती. पोस्टरमध्ये तो शोएबची 14 क्रमांकाची जर्सी घातलेलाही दिसून आला. या चित्रपटात तोच शोएबची भूमिका साकारणार असल्याचेही त्याने सांगितले होते. शोएब अख्तर 'रावळपिंडी एक्सप्रेस' नावाने ओळखला जातो. त्यामुळेच, हा चित्रपटही त्याच नावाने प्रदर्शित होणार होता. 'शोएबचे आयुष्य अनेकांसाठी प्रेरणा आहे. तो केवळ पाकिस्तानचाच नाही तर जगातला मोठा स्टार आहे, असे उमरने पोस्टर लाँचिंगवेळी म्हटले होते. मात्र, आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
शोएब अख्तरने चित्रपट निर्मात्यावर गंभीर आरोप केले आहेत. शोएबच्या मॅनेजमेंट आणि लिगल टीमने यासंदर्भात कार्यवाहीही सुरु केली आहे. जर चित्रपट निर्माते माझ्या नावाच वापर करुन चित्रपट पुढे नेताना किंवा चित्रपट प्रदर्शित करताना दिसून आल्यास मी त्यांच्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे, असेही शोएब अख्तरने ट्विटरवरुन स्पष्टपणे म्हटले आहे. शोएबने चित्रपटासंदर्भात भूमिका बदलल्यानंतर चित्रपटात शोएबची भूमिका निभावणाऱ्या उमर जसवालनेही हा चित्रपट सोडून दिला आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच कंटेंटवर वाद झाल्याने शोएबने हा चित्रपट सोडून दिला होता, या महिन्याच्या सुरुवातीलाच त्याने याबाबत घोषणाही केली होती.