नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाने ४ गडी राखून पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. पाकिस्तानचा पराभव होताच शेजारी देशातील माजी खेळाडूंनी अम्पायरवर प्रश्न उपस्थित केले आहेत. खरं तर अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर आर अश्विनने चौकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. मात्र भारताला अखेरच्या षटकांत विजयासाठी १६ धावांची आवश्यकता होती. पहिल्या ३ चेंडूत गोलंदाज मोहम्मद नवाजने शानदार गोलंदाजी केली. अखेर ३ चेंडूंत १३ धावा हव्या असताना विराटने खणखणीत षटकार खेचला अन् हाईटमुळे तो नो बॉल ठरवला गेला. आता ३ चेंडूंत ६ धावाच करायच्या होत्या. फ्री हिटचा चेंडू नवाजने वाईड टाकला. फ्री हिटवर चेंडू स्टम्पवर आदळून फाईन लेगला गेला, परंतु विराट व दिनेश कार्तिकने ३ धावा पळून काढल्या.
लक्षणीय बाब म्हणजे याच नो बॉलचा दाखला देऊन पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने अम्पायरच्या नो बॉलच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. फ्री हिटच्या चेंडूवर कोहली-कार्तिकने ३ धावा धावून काढल्या, त्यामुळे भारतीय संघाने विजयाकडे कूच केली. अख्तरने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "तो बॉल नो नव्हता अम्पायरांनी बघून निर्णय द्यायला हवा होता." तसेच आणखी एक ट्विट करून अख्तरने अम्पायरवर निशाणा साधला आहे. अख्तरच्या या ट्विटनंतर चाहत्यांनी त्याची चांगलीच खिल्ली उडवली आहे.
पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी आक्रमक मारा करून पाकिस्तानच्या सलामीवीरांना स्वस्तात माघारी पाठवले. भारतीय गोलंदाजांनी सांघिक खेळी करून प्रतिस्पर्धी संघावर दबाव कायम ठेवला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम डावाच्या दुसऱ्याच षटकांत बाद झाला. त्याला वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने बाहेरचा रस्ता दाखवला. अर्शदीप सिंगने पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात माघारी पाठवून भारताला चांगली सुरूवात करून दिली. अखेरच्या काही षटकांमध्ये पाकिस्तानने डाव सावरला आणि २० षटकांत ८ बाद १५९ धावा करून भारतासमोर विजयासाठी १६० धावांचे आव्हान ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना किंग कोहलीने ऐतिहासिक खेळी केली.
भारतीय गोलंदाजांची सांघिक खेळी
भारताकडून हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले. तर भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांना १-१ बळी घेण्यात यश आले. पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात अत्यंत निराशाजनक झाली होती. भारताचे दोन्ही सलामीवीर संघाच्या अवघ्या १० धावांवर माघारी परतले होते. मात्र विराट कोहलीने सावध खेळी करून डाव सावरला. सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल हेही स्वस्तात परतले. संघाची धावसंख्या ३१ असताना ४ गडी बाद झाले होते. अशा स्थितीत किंग कोहलीने संघाचा डाव सावरला आणि अखेरच्या षटकापर्यंत नेला. विराट कोहलीने ५३ चेंडूत ८२ धावांची नाबाद खेळी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
किंग कोहलीची विराट खेळी
हॅरीस रौफच्या १९व्या षटकात विराटने दोन खणखणीत षटकार खेचून १५ धावा जोडल्या. भारताला आता६ चेंडूंत १६ धावा हव्या होत्या. मोहम्मद नवाजच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने उत्तुंग फटका मारला, परंतु बाबरने झेल टिपला. हार्दिक ३७ चेंडूंत ४० धावांवर बाद झाला. ३ चेंडूंत १३ धावा हव्या असताना विराटने खणखणीत षटकार खेचला अन् हाईटमुळे तो नो बॉल ठरवला गेला. आता ३ चेंडूंत ६ धावाच करायच्या होत्या. फ्री हिटचा चेंडू नवाजने वाईड टाकला. फ्री हिटवर चेंडू स्टम्पवर आदळून फाईन लेगला गेला, परंतु विराट व दिनेश कार्तिकने ३ धावा पळून काढल्या. पाकिस्तानचे खेळाडू प्रचंड नाराज दिसले. डेड बॉलची मागणी करू लागले. २ चेंडू २ धावा हव्या होत्या आणि कार्तिक स्ट्राईकवर होता. पण, कार्तिक स्टम्पिंग झाला. १ चेंडू २ धावा असे असताना अश्विन स्ट्राईकवर होता. नवाजने Wide टाकला अन् सामना बरोबरीत आला. अश्विनने विजयी चौकार मारला आणि भारताने ४ गडी राखून सामना जिंकला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Shoaib Akhtar is being trolled for questioning on umpire after Pakistan's loss in the IND vs PAK match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.