नवी दिल्ली : पाच ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार असून यासाठी देशभरातील संघ भारतात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तानी संघ देखील हैदराबादमध्ये दाखल झाला आहे. खरं तर पाकिस्तानी संघ सात वर्षांनंतर भारतात आला आहे. बाबर आझमच्या संघाने प्रथम लाहोर ते दुबई असा प्रवास केला. दुबईहून पाकिस्तानी संघ हैदराबाद विमानतळावर दाखल झाला. पाकिस्तानी संघाचे भारतातील स्वागत पाहून पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने एक हटके पोस्ट केली.
शोएब अख्तरने सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले, "पाकिस्तान क्रिकेट संघाचे भारतात झालेले स्वागत पाहून खूप आनंद झाला. हेच तर खेळाचे सौंदर्य आहे. हे देखील आपल्याला एक जाणीव करून देते की, आपण मागील एक दशक किंवा त्यापेक्षा जास्त काळ काय गमावत आहोत." एकूणच पाकिस्तान आणि भारत यांच्यात द्विपक्षीय मालिका होत नसल्याने अख्तरने हे विधान केले आहे. अख्तरच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी संघाप्रती भारतीयांच्या मनात प्रेम असून याचा प्रत्यय हैदराबादमध्ये आला.
पाकिस्तानच्या संघाचे हैदराबाद विमानतळावर दणक्यात स्वागत करण्यात आले. बाबर प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी आपल्या संघासोबत आला आहे. या आधी २०१६ मध्ये पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय संघ भारतीय भूमीत उतरला होता. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर पाकिस्तानी संघ भारतात दाखल झाला. कारण बाबरच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला व्हिसा मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे त्याच्या संघाला भारतात पोहोचण्यास वेळ लागला. म्हणून दुबईत होणारे पाकिस्तान संघाचे शिबिरही रद्द करण्यात आले. पाकिस्तानने पहिल्यांदा लाहोर ते दुबई असा प्रवास केला. त्यानंतर ते दुबईहून भारतातील हैदराबाद येथे पोहोचले. जिथे २९ सप्टेंबरला पाकिस्तान संघ २०२३च्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळणार आहे.
विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ -बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, सॅम मीर, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हसन अली आणि शाहीन आफ्रिदी.
राखीव खेळाडू - मोहम्मद हारिस, जमान खान, अबरार अहमद.