पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) याला पाकिस्तान सुपर लीगमधील ( Pakistan Super League) फ्रँचायझी लाहोर कलंदर्स ( Lahore Qalandars) खरेदी करायची आहे. या फ्रँचायझीचे मालक क्रिकेटचा गांभीर्यानं विचार करत नसल्याचा आरोप करताना अख्तरनं फ्रँचायझी मालकावर टीका केली.लाहोर कलंदर्सचे मालकी हक्क सध्या फवाद राणा याच्याकडे आहे. फवाद हे पाकिस्तानमधील एक व्यावसायिक आहे. फवाद राणा दोहा स्थिथ QALCO कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. अख्तरनं लाहोर कलंदर्स विकण्याचा विचार करण्याची विनंती फवाद राणा यांना केली आहे. मालकी हक्क विकत घेतल्यानंतर संघाचे नाव लाहोर एक्स्प्रेस असे ठेवायचे आहे. अख्तर स्वतः रावळपिंडी एक्स्प्रेस या नावानं ओळखला जातो, त्यामुळेच त्यानं संघाचे नाव तसेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अख्तरनं म्हटलं की,''मला तुमचा संघ विका, असे मी राणा बंधुंना सांगितले आहे. त्याचं नाव बदलून मी लाहोर एक्स्प्रेस असे ठेवणार आहे. सध्याचे मालक व संघ व्यवस्थापक क्रिकेटबाबत गंभीर नाहीत. ते लाहोर ब्रँडचं नाव खराब करत आहेत.''
पाकिस्तान सुपर लीगच्या सहाव्या पर्वात लाहोर कलंदर्स प्ले ऑफसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरला. त्यांना १० पैकी ५ सामने जिंकता आले. त्यांना मागील चार सामन्यांत अनुक्रमे इस्लामाबाद युनायटेड, क्वेटा ग्लॅडिएटर्स, कराची किंग्स व मुल्तान सुल्तान संघाकडून पराभव पत्करावा लागला.
लाहोर संघात राशिद खान, मोहम्मद हाफीज, हॅरिस रौफ आणि फखर जमान हे स्टार खेळाडू आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त कॉलीन फर्ग्युसन, डेव्हीड वेस, टीम डेव्हीड, जेम्स फॉल्कनर, बेन डक, समित पटेल, शाहीन शाह आफ्रिदी हेही ट्वेंटी-२० स्पेशालिस्ट खेळाडू आहेत.