पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shaoib Akhtar) पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमचा (Babar Azam) एक व्हिडीओ ट्विट करत, पाकिस्तानी क्रिकेटपटू स्मार्ट कसे ठरतात याचं उदाहरण सादर केलं आहे.
शोएब अख्तरने ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये बाबर आझम घरात क्रिकेट खेळताना दिसतोय. गोलंदाजाने यष्टीजवळ कलेला चेंडू बाबर आझम अतिशय शिताफीनं थर्ड मॅनच्या दिशेनं टोलवताना दिसत आहे. बाबरने टोलवलेला चेंडू यष्टिरक्षकाला चकवून मागे जातो. गली क्रिकेट म्हणजे स्ट्रीक क्रिकेट खेळल्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटूंमध्ये स्मार्टनेस येतो, असं शोएबनं दाखवून दिलं आहे. या व्हिडीओच्या पुढील भागात बाबर आझम क्रिकेटचे हेच तंत्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरताना दिसतोय. बाबरने तंत्रशुद्ध फटका लगावत चेंडू टोलवला आणि थर्ड मॅनच्या दिशेनं चौकारदेखील वसूल केला. शोएब अख्तरनं बाबरच्या याच चलाखीचं कौतुक केलं आहे.
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी-20 सामन्यातील बाबर आझमनं लगावलेला हा फटका आहे. "गल्ली आणि घरात क्रिकेट खेळून पाकिस्तानी क्रिकेटपटू स्मार्ट झाले आहेत. गल्ली आणि घरात जोरदार फटका मारण्याएवढी जागा नसते. त्यामुळे नवनवीन शॉट्सचा शोध लावला जातो. बाबरनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात यापैकीच एक उदाहरण दाखवलं", असं शोएबने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
बाबर आझम आयसीसीच्या रँकिंगमध्ये नंबर १
आयसीसीने गेल्या आठवड्यात वन डे रँकिंग जाहीर केली. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आयसीसी क्रमवारीत पिछाडीवर पडला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आता जगातील नंबर 1 वन डे फलंदाज ठरला आहे. तर विराट कोहली दुसऱ्या स्थानी घसरला आहे. पाकिस्तानने नुकतंच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन डे मालिका 2-1 ने जिंकली होती. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात बाबर आझमने 94 धावांची जबरदस्त खेळी केली होती. त्यामुळे बाबर आझमच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे.
Web Title: shoaib akhtar posts video of babar azam example of street smartness of pakistan cricketers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.