Shoaib Akhtar on Virat Kohli, Pakistan : भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याचे संपूर्ण जगभरात असंख्य चाहते आहेत. जगातील दमदार फलंदाजांपैकी एक मानल्या जाणाऱ्या विराटला शेजारील राष्ट्र असलेल्या पाकिस्तानातही चाहत्यांची काहीच कमी नाही. पाकिस्तानातील चाहत्यांनी आणि काही क्रिकेटपटूंनी विराटबद्दल आपल्या भावना खुल्या दिलाने वेळोवेळी व्यक्त केल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणाव पाहता या दोन देशातील क्रिकेट मालिका बंद आहेत, तसेच भारतीय संघ पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यासाठीही जात नाही. असे असताना एका स्पर्धेत 'विराटचं शतक पाकिस्तानात पाहायचंय' अशी इच्छा व्यक्त करणारा एक बॅनर दिसला होता. त्या बॅनरवर शोएब अख्तरने उत्तर दिलं.
पाकिस्तान सुपर लीग टी२० स्पर्धेत (PSL) शुक्रवारी मुलतान सुलतान्स विरुद्ध क्वेट्टा ग्लॅडिएटर्स यांच्यात लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर सामना सुरू होता. त्यावेली विराट कोहलीचं एक पोस्टर पाहायला मिळालं. लाहोरच्या स्टेडियमवरील विराटच्या पोस्टरवर लिहिण्यात आलं होतं की विराट कोहलीला पाकिस्तानात शतक करताना पाहायचे आहे. त्याच पोस्टरचा फोटो शोएब अख्तरने पोस्ट केला आणि त्यावर प्रतिक्रिया दिली. हे पाहा, कोणी तरी (द्वेष विसरून) गद्दाफी स्टेडियमवर प्रेमाची उधळण करत आहे, असं ट्वीट करत त्याने तो फोटो शेअर केला.
शोएब अख्तरने वेळोवेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका व्हाव्यात अशी भूमिका उघडपणे मांडली आहे. कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात शोएब अख्तरने एक प्रस्तावही ठेवला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याला तुफान गर्दी होते हे साऱ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे भारत-पाक यांच्यात सामना भरवून त्यातून मिळालेला निधी हा दोन्ही देशातील कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी वापरण्यात यावा असा प्रस्ताव त्याने ठेवला होता. त्या प्रस्तावाला भारतीय आजी माजी खेळाडूंनी सणकून विरोध केला होता.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना मुलतान संघाकडून शान मसूद, कर्णधार मोहम्मद रिझवान आणि रॅली रुसो यांनी तुफान फटकेबाजी केली. शान मसूदने ३८ चेंडूत ५७ धावा केल्या. तर रूसोने २६ चेंडूंत ७१ धावा कुटल्या. रिझवाननेही ५४ चेंडूंत ८३ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात क्वेट्टा संघ मात्र १२८ धावांतच बाद झाला.