मुंबई : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने मॅच फिक्सिंगबाबत एक मोठा खुलासा केला आहे. शोएबने यावेळी पाकिस्तानच्या संघाची पोलखोल केल्याचे पाहायला मिळत आहे.
शोएब म्हणाला की, " मी 21 क्रिकेटपटूंच्या विरोधात खेळत होतो. त्यामध्ये 11 हे प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू होते, तर 10 माझ्याच संघातील क्रिकेटपटू होते."
शोएबने आपल्या पाकिस्तानच्या संघातील खेळाडूंवरच मॅच फिक्सिंगचे भयंकर आरोप केले आहे. पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर आणि मोहम्मद आसिफ हे इंग्लंडमध्ये स्पॉट फिक्संगमध्ये सापडले होते. त्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई आयसीसी आणि पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने केली होती.
याबाबत शोएब 'रिवाइंड विद समीना पीरजादा' या कार्यक्रमात म्हणाला की, " मी कधीच पाकिस्तानला धोका दिला नाही. मी कधीही मॅच फिक्सिंग केले नाही. सट्टेबाज माझ्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचे, पण मी त्यांना कधीही भीक घातली नाही. पाकिस्तानचे बहुतांशी सामने फिक्स होते. संघातील कोणता खेळाडू मॅच फिक्सिंग करत होता, हे मला समजत नव्हतं."
तो पुढे म्हणाला की, " पाकिस्तानचे सामने कसे फिक्स होतात, हे मला पाकिस्तानच्या एका खेळाडूने सांगितले होते. मोहम्मद आसिफ हे त्याचे नाव. आसिफने बऱ्याच सामन्यांत फिक्सिंग केले होते. हे सामने कसे फिक्स केले जातात हेदेखील त्याने मला सांगितले होते."