legends league cricket 2023 । कतार : सध्या कतारच्या धरतीवर लीजेंड्स लीग क्रिकेटचा थरार रंगला आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिजसह जगभरातील निवृत्त खेळाडू इथे खेळत आहेत. लीजेंड्स क्रिकेट लीग 2023 चा चौथा सामना इंडिया महाराजा आणि आशिया लायन्स यांच्यात खेळला गेला. गौतम गंभीरच्या नेतृत्वातील इंडिया महाराजाच्या संघाने शाहिद आफ्रिदीच्या आशिया लायन्सचा पराभव करून विजयाचे खाते उघडले. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर देखील या बहुचर्चित स्पर्धेचा भाग आहे.
दरम्यान, आगामी आशिया चषकाच्या यजमानपदावरून भारतीय क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात वाद सुरू आहे. खरं तर नियोजित वेळापत्रकानुसार आशिया चषक 2023 पाकिस्तानच्या धरतीवर होणार आहे, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे. अशातच पाकिस्तानने देखील आक्रमक पवित्रा घेत भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकात सहभागी न होण्याचे म्हटले आहे. याबाबत बोलताना शोएब अख्तरने आशिया चषक पाकिस्तान किंवा श्रीलंका या देशातच व्हावा असे म्हटले आहे.
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना अख्तरने म्हटले, "खेळताना मला भारताची खूप आठवण येते. भारताने मला अपार प्रेम दिले आहे. पण मला आशिया चषक पाकिस्तान किंवा श्रीलंकेत पाहायचा आहे. विराट कोहलीचे पुनरागमन पाहून मला आश्चर्य वाटले नाही. कारण तो एक अनुभवी खेळाडू आहे." एकूणच शोएब अख्तरने विराट कोहलीचे कौतुक केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"