Join us  

"आमचे क्रिकेटपटू भारतातून येणाऱ्या पैशावर...", शोएब अख्तरनं सांगितलं आर्थिक 'गणित'

shoaib akhtar pakistani cricketer : पाकिस्तानी संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 4:38 PM

Open in App

नवी दिल्ली : पाकिस्तानी संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. क्रिकेटला रामराम करून बराच काळ लोटला असला तरी अख्तर विद्यमान घडामोडींवर भाष्य करत असतो. नेहमी वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या अख्तरने आता एक विधान करून सर्वांचे लक्ष वेधले. एका भारतीय क्रीडा पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत त्याने पाकिस्तान क्रिकेटबद्दल भाष्य केले. पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या पैशावर जगत असल्याचे परखड मत अख्तरने मांडले.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. बीसीसीआय आणि इतर बोर्डांकडून आयसीसीकडे येणारा पैसा महसूल वाटणीअंतर्गत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पाठवला जातो. पाकिस्तानातील देशांतर्गत क्रिकेटपटूंना त्या पैशांच्या जोरावरच मॅच फी मिळते, असे अख्तरने नमूद केले.

अख्तरनं सांगितलं आर्थिक गणित  शोएब अख्तरने सांगितले की, २०२३ च्या विश्वचषकात एक वेगळीच मजा येणार आहे. कारण आता ५० षटकांच्या क्रिकेटचे भविष्य दिसत नाही. या विश्वचषकातून भारताने भरपूर कमाई करावी अशी माझी इच्छा आहे. हे सांगायला अनेकांना संकोच वाटेल. पण मी स्पष्टपणे सांगतो की भारताचा महसूल आयसीसीला जातो. त्याचा वाटा पाकिस्तानातही येतो आणि त्यातून आमच्या देशांतर्गत क्रिकेटपटूंना मॅच फी मिळते. एकूणच भारतातून येणाऱ्या पैशातून पाकिस्तानातील युवा क्रिकेटपटूंचे पालनपोषण होत असल्याचे अख्तरने स्पष्ट केलं.  ३० ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या आशिया चषकाबद्दल विचारलं असता अख्तरने म्हटलं, "पुन्हा एकदा भारतीय संघावर अधिक दबाव असेल. भारतीय मीडियामुळे टीम इंडियावर जास्त दबाव असतो. प्रत्येकवेळी हे असंच होत असतं. मागच्या वेळीही आशिया चषकादरम्यान भारतीय मीडियाने टीम इंडियावर खूप दबाव आणला होता. संपूर्ण स्टेडियम निळ्या रंगाचे करण्यात आले होते. त्यामुळे पाकिस्तानी संघावर दबाव नसतो, जे मागच्या वेळी दिसले अन् आम्ही टीम इंडियाचा पराभव केला."

टॅग्स :शोएब अख्तरपाकिस्तानबीसीसीआयआयसीसीभारतीय क्रिकेट संघएशिया कप 2022
Open in App