Shoaib Akhtar, Harbhajan Singh: पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर आणि भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग यांची मैत्री जगजाहीर आहे. दोघंही अनेकदा एकाच शोमध्ये उपस्थित राहिल्याचंही आपण पाहिलं आहे. नुकतंच एका कार्यक्रमात दोघांमध्ये धमाल मस्ती पाहायला मिळाली.
एका कार्यक्रमात शोएब अख्तर आणि हरभजन सिंग एकत्र होते. यातच हरभजन सिंगनं शोएब अख्तर याला काही मजेशीर प्रश्न विचारले. ज्याची शोएब अख्तरनं देखील दिलखुलासपणे उत्तरं दिली. हरभजननं मुद्दाम शोएब अख्तरला त्याचं नाव विचारलं तर शोएबनंही जाणूनबुजून आपलं नाव शाहिद आफ्रिदी असल्याचं म्हटलं आणि एकच हशा पिकला.
हरभजन सिंगनं त्यानंतर तुम्ही काय करता? असा प्रश्न विचारला असता शोएब अख्तरनं मी केळी विकतो असं उत्तर दिलं. त्यानंतर कार्यक्रमात सर्वच खळखळून हसायला लागले. मी तर माझ्या गोलंदाजीसाठी नव्हे, तर आता माझ्या अभिनयासाठी लोकप्रिय झालोय असंही गमतीत शोएब अख्तरनं म्हटलं. हरभजन आणि शोएब अख्तर क्रिकेट संदर्भात अनेक टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये एकत्र उपस्थित राहताना आपण पाहिलं आहे. नुकतंच ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतही दोघं एकत्र पाहायला मिळाले होते.
शोएब अख्तरच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाशोएब अख्तरच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया होणार असून तो त्यासाठी लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असल्याचं त्यानं सांगितलं आहे. पाकिस्तानमधील एका टेलिव्हिजन कार्यक्रमात अपमान झाल्यानं लाइव्ह शोमध्ये शोएब अख्तरनं आपला राजीनामा दिल्याचा वाद नुकताच घडला होता. या वादामुळे शोएब अख्तर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला होता. पाकिस्तानी टेलिव्हिजन अँकर आणि शोएब अख्तर यांच्यात वाद झाला होता. पाकिस्तानी सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला देखील होता.