स्टीव्ह स्मिथच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानच्या 6 बाद 150 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानं दमदार खेळ केला. ऑस्ट्रेलियानं 7 विकेटनं हा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता आणि तिसरा सामना उद्या होणार आहे. पण, दुसऱ्या सामन्यातील पराभव पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यानं थेट स्मिथच्या तोंडावर चेंडू फेकून मारण्याची भाषा केली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानला ऑसींनी चांगले धक्के दिले. फाखर जमान ( 2) आणि हॅरीस सोहैल ( 6) यांना अनुक्रमे पॅट कमिन्स व केन रिचर्डसन यांनी माघारी पाठवले. त्यानंतर मोहम्मद रिझवानने (14) काही काळ आझमसह संघाचा डाव सावरला. पण, त्याला अॅस्टन अॅगरने बाद केले. पाचव्या क्रमांकावर आलेल्या आसीफ अलीकडून आझमला अपेक्षा होत्या. मात्र, अवघे पाच चेंडूंत 4 धावा करून तो माघारी परतला. आसीफची विकेट गेल्यानंतर आझमही माघारी परतला. त्यानं 38 चेंडूंत 6 चौकारांसह 50 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरच्या डायरेक्ट हिटनं आझमला माघारी पाठवले. त्यानंतर इफ्तियार अहमदनं 34 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकार खेचत नाबाद 62 धावा करताना संघाला 6 बाद 150 धावांपर्यंत मजल मारून दिली.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने धडाक्यात सुरुवात केली. त्यानं 11 चेंडूंत 4 चौकार लगावताना 20 धावा केल्या. पण, मोहम्मद आमीरनं त्याला त्रिफळाचीत केलं. कर्णधार अॅरोन फिंच ( 17) मोहम्मद इरफानच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ व बेन मॅकडेर्मोट या जोडीनं पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. स्मिथनं 36 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. स्मिथ व मॅकडेर्मोट जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 58 धावा जोडल्या. 22 चेंडूंत 21 धावा करून मॅकडेर्मोट माघारी परतला. स्मिथनं 51 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 80 धावा केल्या
या सामन्यात स्मिथनं बाऊंसरवर असा एक फटका मारला, तो पाहून भले भले अवाक् झाले. पण, अख्तरनं टीका केली. तो म्हणाला,''कोणतेही तंत्रशुद्ध नसताना स्मिथ चांगला खेळत आहे. माझ्या गोलंदाजीवर स्मिथनं तो फटका मारला असता, तर मी चेंडू त्याच्या तोंडावर फेकून मारला असता.''
पाहा व्हिडीओ...
Web Title: Shoaib Akhtar Trolls Steve Smith For "No Technique", Says "Would Have Tried To Hurt Him"
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.