नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात आशिया चषकाच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. अद्याप या वादावर तोडगा निघाला नाही. आगामी आशिया चषक नियोजित वेळापत्रकानुसार पाकिस्तानात होणार आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. या प्रकरणावर दोन्ही देशातील माजी खेळाडू प्रतिक्रिया देत आहेत. अशातच पाकिस्तानी संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने आर्थिक गणित मांडून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मोदी सरकारमुळे बीसीसीआय भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवू शकत नाही. आशिया चषक आणि आयसीसीचा विश्वचषक यामध्ये फरक आहे. आशिया चषकासाठी टीम इंडिया पाकिस्तानात येईल की नाही हे सांगू शकत नाही, असे शोएब अख्तरने सांगितले. तसेच पाकिस्तानी संघ भारतात गेला नाही तर तेथील जाहीरात क्षेत्रातील लोकांना मोठा फटका बसेल. कारण स्टार स्पोर्ट्सचे सीइओ माझ्या परिचयाचे आहेत, मी भारतातीत जवळपास १० चॅनेलसाठी काम केले आहे, असे अख्तरने नमूद केले. वानखेडेवर पाकिस्तानने भारताला हरवावे - अख्तर पाकिस्तानातील नादिर अली पॉडकास्टवर बोलताना अख्तरने बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यातील वादावर भाष्य केले. "आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानात येऊन पीसीबीशी चर्चा केली आणि पाकिस्तानी संघाला वन डे विश्वचषकासाठी पाठवण्याची विनंती केली. मला वाटते की, पाकिस्तानने विश्वचषकासाठी नक्कीच भारतात जावे. भारत आणि पाकिस्तान मुंबईतील वानखेडेवर आमनेसामने यावेत आणि तिथे पाकिस्तानी संघाने यजमान संघाचा पराभव करून २०११ चा माझा राग काढावा", असे शोएब अख्तरने आणखी सांगितले.