पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवे अध्यक्ष रमीज राजा यांच्यानंतर आता इंग्लंड क्रिकेट बोर्डावर माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याचाही राग उफाळून आला आहे. इंग्लंडनेपाकिस्तान दौरा रद्द करताच माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सोशल मीडियाद्वारे आपला राग व्यक्त केला. या दरम्यान शोएब अख्तरने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला खडसावले आणि बदला घेण्याविषयी म्हटले आहे.
पाकिस्तान क्रिकेटचे नाव रोशन करण्यात शोएब अख्तरचाही मोठा हात आहे, त्यामुळे तो वेळोवेळी देशाच्या क्रिकेटबाबत आपले मत मांडताना दिसतो. न्यूझीलंडनंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान दौरा रद्द केल्याने शोएब अख्तर भडकला आणि त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून आपला राग व्यक्त केला. यासह, या व्हिडिओमध्ये, त्याने दोन्ही देशांना एक कठोर संदेश देखील दिला आहे.
शोएब अख्तरने यादरम्यान टी -20 विश्वचषकासंदर्भात निवेदनही दिले आहे आणि पाकिस्तान बोर्डाला या स्पर्धेसाठी संघ बदलण्याचा सल्ला दिला आहे. याचबरोबर, शोएब म्हणाला की, आता पाकिस्तान संघ विश्वचषकातील प्रत्येकाचा बदला घेईल आणि स्पर्धा जिंकून दाखवेल. गेल्या काही दिवसांपासून टी -20 विश्वचषकासाठी निवडलेल्या संघाबद्दल पाकिस्तान क्रिकेटमध्ये प्रचंड गदारोळ होता, तसेच दिग्गज खेळाडूंनी या संघ निवडीला पूर्णपणे चुकीचे म्हटले होते.
दरम्यान, सुरक्षा कारणांमुळे पाकिस्तान दौरा रद्द केल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेट संघ मायदेशी परतला आहे. न्यूझीलंडने घेतलेल्या या निर्णयाचा इतर संघांवरही परिणाम झाला आहे. न्यूझीलंडनंतर आता इंग्लंडनेही सुरक्षेचे कारण देत पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. पाकिस्तान दौऱ्यावर इंग्लंड ऑक्टोबरमध्ये दोन टी -20 सामने खेळणार होता. त्याच वेळी, इंग्लंड महिला क्रिकेट संघ देखील पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणार होता, परंतु इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोमवारी दौरा रद्द करण्याची घोषणा केली.
इंग्लंडचा पाकिस्तान दौरा रद्द झाल्यानंतर भडकले रमीज राजाइंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रमीज राजा हे भडकले आहेत. राजा यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयाबद्दल ट्विट करून आपली निराशा व्यक्त केली आहे. तसेच, दुसऱ्या एका निवेदनात इंग्लंडच्या खेळाडूंची खिल्ली उडवली आहे. ‘इंग्लंडने त्यांचे वचन न पाळण्याच्या आणि क्रिकेट विश्वातील सदस्याला अपयशी ठरवण्याच्या निर्णयामुळे निराश झालो, असे रमीज राजा यांनी ट्विट केले आहे. याचबरोबर, आमचा संघ आणि चाहते या दोन देशांविरुद्ध आपला राग एका प्रकारे व्यक्त करू शकतात. जर आपण विश्वचषकाला गेलो तर, पूर्वी आमच्या शेजारी देश (भारत) आमच्या टार्गेटवर असायचा पण आता भारताबरोबर आणखी दोन संघांची नावे जोडा. त्यांना सांगा की आम्ही हरणार नाही. त्यांचा बदला आम्ही मैदान-ए-जंगमध्ये घेऊ, असे रमीज राजा म्हणाले.