ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी ( T20 World Cup) भारतीय संघाला जसप्रीत बुमराहच्या माघारीमुळे मोठा धक्का बसला आहे. पाठीच्या दुखापतीने डोकं वर काढल्याने जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये खेळणार नसल्याचे PTI ने म्हटले आहे. BCCI कडून याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, परंतु जसप्रीत खेळणार नसल्याचे हे निश्चित झाल्यात जमा आहे. अशात पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात १० महिन्यांपूर्वीच शोएबने भारतीय गोलंदाजाबद्दल मोठे विधान केले होते.
मोहम्मद शमी किंवा दीपक चहर नव्हे तर तिसराच गोलंदाज जसप्रीत बुमराहला करणार रिप्लेस
आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर जसप्रीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत मैदानावर उतरला. तीन सामन्यांपैकी दोनच सामने तो खेळला, परंतु काही खास कामगिरी झाली नाही. कालपासून भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात झाली आणि पहिल्याच सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याचे कर्णधार रोहितने जाहीर केले. सराव सत्रात जसप्रीतच्या पाठीच्या दुखापतीनं डोकं वर काढल्याचे BCCI ने सांगितले. वैद्यकीय टीम त्याच्यावर उपचार करत असल्याचे ट्विट BCCI ने केले. त्यात आज हाती आलेल्या बातमीनुसार त्याच्या पाठीची दुखापत गंभीर आहे, त्यावर शस्त्रक्रियेची गरज नसली तरी ६ महिने तो क्रिकेटपासून दूर रहणार आहे.
शोएब अख्तर काय म्हणाला होता? बुमराहला मागील तीन महिन्यांत दुसऱ्यांदा या दुखापतीमुळे सामन्याला मुकावे लागले होते. यापूर्वी जून-जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यानंतर त्याच्या या दुखापतीने डोकं वर काढले होते. त्यामुळेच त्याने वेस्ट इंडिज दौरा व आशिया चषक २०२२ स्पर्धेतून माघार घेतली होती. स्पोर्ट्स तकसोबत बोलताना अख्तरने बुमराहच्या दुखापतीबाबत विधान केलं होतं. त्याने म्हटलेले,''बुमराह त्याच्या पाठीच्या व खांद्याच्या जोरावर वेगाने गोलंदाजी करतो. बुमराहची गोलंदाजी फ्रंटल अॅक्शनवरच टीकून आहे. आम्ही साइड ऑन गोलंदाजी करत होतो आणि त्याची आम्हाला भरपाई करावी लागायची. पण, फ्रंटल अॅक्शनसोबत कोणतंच कंपनसेशन नसतं. एकदा पाठीच्या दुखापतीनं डोकं वर काढलं तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. फ्रंटल अॅक्शनमुळे इयान बिशॉप व शेन बॉन्ड यांची हालत खराब होताना मी पाहिली आहे. बुमराहलाही यादृष्टीने विचार करायला हवा.''
तो पुढे म्हणाला, बुमराहला त्याच्या वर्कलोडचं व्यवस्थापन करायला हवं. त्याने प्रत्येक सामना खेळायला हवा, असं न करता विश्रांती घेत खेळले पाहिजे. तो प्रत्येक सामना खेळला, तर वर्षभरात तो पूर्णपणे खचून जाईल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"