नवी दिल्ली : २००७ मध्ये पहिल्यांदा टी-२० विश्वचषक खेळला गेला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करून किताब पटकावला होता. मिस्बाह-उल-हकच्या फलंदाजीच्या भीतीने भारताच्या प्रमुख गोलंदाजांनी शेवटच्या षटकात गोलंदाजी करण्यास नकार दिल्याचा दावा पाकिस्तानचा तत्कालीन कर्णधार शोएब मलिकने केला आहे. आज टी-२० विश्वचषक २०२२चा अंतिम सामना मेलबर्न येथे इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात पार पडला, ज्यामध्ये इंग्लिश संघाने ५ गडी राखून विजय मिळवून किताब पटकावला. पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने स्पोर्ट्स शोमध्ये याबाबत टिप्पणी केली आहे.
धोनीचे बॉलर मिस्बाहला घाबरत होते - शोएब मलिक शोएब मलिकने म्हटले, "मी नाव घेणार नाही. भारताच्या प्रत्येक प्रमुख गोलंदाजाचे १-१ षटक राहिले होते. धोनीने सर्वांना विचारले, मात्र त्यांनी शेवटचे षटक टाकण्यास नकार दिला. ते मिस्बाह उल हकला गोलंदाजी करण्यासाठी घाबरत होते. कारण तो मैदानाच्या चारी बाजूला फटके मारत होता. लोक नेहमी मिस्बाहच्या स्कूप शॉटबद्दल बोलतात. जर ती शेवटची विकेट नसती तर शेवटचा गडी बाद होईपर्यंत त्याने तो शॉर्ट खेळला असता. त्या षटकात त्याने आधीच जोगिंदरला षटकार ठोकला होता."
मिस्बाहने का खेळला होता स्कूप? ज्या शोमध्ये शोएब मलिक बोलत होता तिथे मिस्बाह देखील उपस्थित होता. मिस्बाहने शेवटच्या षटकात जोगिंदर शर्माविरुद्ध स्कूप शॉट खेळण्याचे कारण सांगितले. तो म्हणाला, "संपूर्ण स्पर्धेत मी हा शॉट खेळला. ही योजना चौकार मारायची होती आणि आम्हाला धावसंख्या बरोबरीत आणण्यासाठी एका धावेची गरज होती. यानंतर ते फिल्डर्संना पुढे आणणार आणि तेव्हाच मला सामना संपवायचा होता."
खरं तर २००७च्या विश्वचषकाच्या फायनलच्या शेवटच्या षटकांत पाकिस्तानला सहा चेंडूत ४ धावांची गरज होती. मिस्बाहने शॉर्ट फाइन लेगवर स्कूप शॉट खेळला आणि चेंडू हवेत गेला. श्रीशांतने हा झेल घेतला आणि भारताने पहिला टी-२० विश्वचषक जिंकला. २००७च्या फायनलबाबत भाष्य करताना मी अजूनही का भावुक होतो याबाबत मलिकने स्पष्टीकरण दिले. "मी भावनिक व्यक्ती नाही, पण फायनलमधील पराभवाने मला अधिक चांगले केले. बाकीच्या संघापेक्षा आम्ही एक पाऊल पुढे होतो. २००७च्या विश्वचषक संघात आमचा दबदबा होता. दुर्दैवाने आम्ही फायनल जिंकू शकलो नाही", असे शोएब मलिकने सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"